Kolhapur: राजकीय आखाड्यातील विरोधक एकाच व्यासपीठावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 04:19 PM2024-02-12T16:19:50+5:302024-02-12T16:20:17+5:30
आमदार ऋतुराज, कृष्णराज जवळजवळ
कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त येथील खासबाग मैदानात रविवारी आयोजित कुस्ती मैदानात राजकीय आखाड्यात एकमेकांचे विरोधक असलेले नेते एकाच व्यासपीठावर आले होते; मात्र ते व्यासपीठावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसले होते.
लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. संभाजीराजे छत्रपती हेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यांचे समर्थक मिशन २०२४ असे फलक हातात घेऊन आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीसंबंधी काही राजकीय भाष्य होईल, असा अंदाज होता; मात्र व्यासपीठावरील वक्त्यांनी कुस्तीवर अधिक बोलणे पसंत केले. संभाजीराजे छत्रपती यांनीही कुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी पुढील वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खासबाग मैदानात करण्याची घोषणा आपल्या भाषणात केली.
व्यासपीठावर शाहू छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, माजी आमदार मालोजी छत्रपती, माजी आमदार चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यामध्ये एकमेकांचे विरोधक चंद्रदीप नरके एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पी. एन. पाटील बसले होते. खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील एकाच व्यासपीठावर मात्र एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसले होते. मैदानात कुस्ती लावताना आणि बक्षीस वितरणावेळीही एकत्र आले नाहीत. यावेळी माजी पालकमंत्री केसरकर यांचेही भाषण झाले.
गोकुळतर्फे भव्य कुस्ती मैदान
माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार लवकरच गोकुळतर्फे भव्य कुस्त्यांचे मैदान भरवले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री मुश्रीफ यांनी केली. यावेळी एक नको, दोन, तीन घ्या, तारीख आताच जाहीर करा, अशी मागणी आर. के. पोवार यांनी केली. यावर मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणुकीमुळे मध्ये दोन, तीन महिन्याचा ब्रेक लागणार आहे. लोकसभा, विधानसभा तुम्हाला लढवायची आहे, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.
आमदार ऋतुराज, कृष्णराज जवळजवळ
एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज व्यासपीठावर जवळजवळ खुर्चीवर बसले होते; मात्र आमदार सतेज पाटील हे व्यासपीठावर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला खासदार महाडिक बसले होते.
३५० वस्तादांचा सत्कार
कुस्ती आयोजन समितीतर्फे जिल्ह्यातील ३५० वस्तादांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यामुळे खासबाग मैदान फेटे आणि भगवे ध्वजमय झाले होते.