विरोध फक्त वर्चस्ववाद्यांना : कोळसे-पाटील
By admin | Published: May 4, 2015 12:21 AM2015-05-04T00:21:45+5:302015-05-04T00:23:00+5:30
परिवर्तनाची हाक : शमशुद्दीन मुश्रीफ यांच्या ‘हू किल्ड करकरे’वर पुस्तकसंवाद
सातारा : ‘मी कोणत्याही जातीचा, धर्माचा विरोधक नाही. वर्चस्ववादी प्रवृत्ती प्रत्येक जातिधर्मात आहेत आणि त्या सर्वांनाच माझा विरोध आहे. ताटात आलेले अन्न कुणाच्या घामाने, श्रमाने, रक्ताने माखले आहे, याचा विचार करणारा मी केवळ मानवतावादी आहे,’ असे उद््गार निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी काढले.
माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांच्या ‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकावरील मुक्तसंवादाचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या सभागृहात मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी करण्यात आले. यावेळी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. अध्यक्षस्थानी लाल निशाण पक्षाचे सरचिटणीस अतुल दिघे होते.
‘वर्चस्ववाद्यांनी महत्त्वाच्या संस्थात्मक संरचना ताब्यात घेण्यास सुरुवात केली असून, यात महत्त्वाच्या गुप्तचर यंत्रणांपासून शिक्षणसंस्थांपर्यंत सर्व संस्थांचा समावेश आहे. वर्चस्ववाद्यांची कटकारस्थाने पूर्वीपासूनच सुरू राहिली असून, कथा-कादंबऱ्या ‘इतिहास’ म्हणून माथी मारल्या गेल्या आहेत. गांधीजींच्या हत्येमागे रचलेल्या षड््यंत्रापेक्षाही मोठी कटकारस्थाने आज रचली जात आहेत. दुसरीकडे, वर्चस्ववाद्यांनी सर्वच क्षेत्रांत शिरकाव केल्याने परजीवी व्यक्तींना प्रतिष्ठा तर श्रमजीवींच्या पदरी उपेक्षा येत आहे,’ असे न्या. कोळसे-पाटील यांनी सांगितले.
दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूमागे मोठे षड््यंत्र होते, असा दावा करताना शमशुद्दीन मुश्रीफ यांनी अनेक पुरावे मांडले. तसेच मुंबई हल्ल्याच्या वेळी बिनतारी यंत्रणेवरून झालेले संभाषण, करकरे यांचा मोबाईल, असे महत्त्वाचे पुरावे तपासात अंतर्भूतच करण्यात आले नाहीत, असेही सांगितले. ‘२००३ ते २००७ या काळात देशभरात १७ बॉम्बस्फोट झाले. यामागे असणारे कटकारस्थान लपविण्याचा प्रयत्न करकरे यांनी उधळला. संबंधितांच्या गुप्त बैठकांचे पुरावे मिळविले. स्फोटके कुठून चोरण्यात आली हे उघड केले. अनेकांना अटक केली. त्यामुळे करकरे वर्चस्ववाद्यांचे शत्रू ठरले होते,’ असे त्यांनी नमूद केले.
यावेळी अस्लम तडसरकर, चंद्रकांत खंडाईत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुरंदरे यांच्या निषेधाचा ठराव
नुकताच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे घटनाद्रोही शक्तींशी संबंध असल्याचा आरोप करून त्यांच्या निषेधाचा ठराव यावेळी करण्यात आला. शिवाजी राऊत यांनी हा ठराव मांडला. उपस्थितांनी हात उंचावून त्यास समर्थन दिले आणि सर्वांनुमते ठराव संमत करण्यात आला.