मॅट चौकशीवरून विरोधकांचा सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:39+5:302021-01-19T04:25:39+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिंगणापूर शाळेतील मॅटच्या चौकशीवरून विरोधकांनी सत्तारूढ पदाधिकाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले. मुख्य ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिंगणापूर शाळेतील मॅटच्या चौकशीवरून विरोधकांनी सत्तारूढ पदाधिकाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनाही टीकेचे लक्ष्य केले. जोरदार खडाजंगी झाली. परंतु ठोस काहीच निर्णय न झाल्याने अखेर विरोधी भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला.
बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेची सुरुवातच विरोधी पक्ष नेते विजय भोजे यांनी मॅट चौकशीच्या प्रकरणावरून केली. त्यांनी मॅट घोटाळ्याचे बॅनर दाखवित थेट पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले. यामध्ये कुणी किती खाल्ले ते सांगा, शिक्षणाधिकारी आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. अधिकारी निर्ढावलेले आहेत, असा आरोप करीत भाेजे यांनी हा विषय ताणून धरला.
अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी भोजे यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. परंतु त्यांच्या अनेक वाक्यांना आक्षेप घेत भोजे, प्रसाद खोबरे, अरूण इंगवले, विजय बोरगे, सुभाष सातपुते, पांडुरंग भांदिगरे यांनी त्यांना बोलण्यापासून रोखले. भोजे म्हणाले, तुमच्याच अहवालानुसार जर शिक्षण आणि वित्त विभागाला दंड ठोठावण्यात आला आहे तर मग त्यांची चूक असल्याचे स्पष्ट होते. मग त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. यावर मित्तल यांनी ठरावीक मर्यादेबाहेर मलाही अधिकार नाहीत असे स्पष्ट केले. जुना अहवाल आणि मित्तल यांचा एकपानी अहवाल यावरूनही जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. पदाधिकाऱ्यांनाही तुमचे तोंड बंद का असा सवाल विचारण्यात आला. हा गोंधळ सुरू असताना अध्यक्ष बजरंग पाटील यांनी मित्तल काय सांगतात आधी ऐकून घ्या असे सदस्यांना सांगितल्यावर सदस्य चांगलेच खवळले. सभेला उशिरा आलेल्या शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनाही विरोधकांनी धारेवर धरले. हा विषय संपल्याशिवाय इतर विषय घेऊ देणार नाही अशी भूमिका भोजे यांनी घेतल्यानंतर मात्र सत्तारूढ सदस्या स्वरूपाराणी जाधव आणि रसिका पाटील यांनी भोजे यांना विरोध केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. विरोधक गेल्यानंतर अर्ध्या तासामध्ये सत्तारूढांनी सर्वच विषय मंजूर करून टाकले.
चौकट
दोन शाळा खोल्यांच्या बदल्यात जिल्हा विकता काय?
यावेळी भोजे यांनी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या मौन बाळगल्यावरही टीका केली. अध्यक्ष, दोन शाळा खोल्यांच्या बदल्यात जिल्हा विकता काय अशी विचारणा त्यांनी केली. यावर यातील सूत्रधारावर कारवाई होणार. आमच्यातील कुणी असला तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
चौकट
अखेर सतीश पाटील यांनी सोडले मौन
तासभर हा सर्व प्रकार पहात असलेले उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी अखेर मौन सोडत अधिकाऱ्यांवर खापर फोडले. पदाधिकारी आणि सदस्यांचे अधिकार इतरांच्या हातात जाण्याला माझा विरोध आहे. अनेक बाबतीत अधिकाऱ्यांनी आम्हांला विश्वासात घेतले नाही. हे चुकीचे आणि निंदनीय आहे असे उपाध्यक्ष पाटील यांनी बजावले.
१८०१२०२१ कोल ०१/०२
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विजय भोजे यांनी मॅट घोटाळ्याचा फलक फडकवला. तसेच नंतर सर्वच विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. (छाया आदित्य वेल्हाळ)