भविष्यात ‘हौसिंग फायनान्स’ला संधी

By admin | Published: September 29, 2015 11:49 PM2015-09-29T23:49:58+5:302015-09-29T23:54:07+5:30

वसंत जुगळे : ‘रवळनाथ’तर्फे आजऱ्यात व्याख्यान

Opportunities for 'Housing Financing' in the Future | भविष्यात ‘हौसिंग फायनान्स’ला संधी

भविष्यात ‘हौसिंग फायनान्स’ला संधी

Next

आजरा : वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणीय संतुलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे मोठ्या लोकसंख्येचे स्थलांतर थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी शहरी नागरी सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याची गरज आहे. किंबहुना सरकारचेही हेच धोरण असल्यामुळे भविष्यकाळात ग्रामीण हौसिंग फायनान्सला अधिक संधी आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंत जुगळे यांनी व्यक्त केले.
श्री रवळनाथ को-आॅप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित ‘हौसिंग फायनान्सचा व्यावसायिक दृष्टिकोन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.
डॉ. जुगळे यांनी वाढत्या मध्यम वर्गाची मागणी आणि हौसिंग फायनान्स क्षेत्रातील आव्हाने व संधी यावर सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, भारतातील उत्पादन करणाऱ्या १४ क्षेत्रामध्ये हौसिंग फायनान्स हे तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. त्यामध्ये ३०० उपक्षेत्र आहेत.
देशातील मध्यमवर्गाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात या दोन्हीच्या वाढीचा वेग अधिक आहे. पूर्वी अवघा १-२ टक्के असणारा हा वर्ग आता १२ ते १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे सरकारचेही लक्ष या मध्यमवर्गीयांच्या मागणीवरच केंद्रित झाले आहे.
येत्या १५ वर्षांत बँकिंग क्षेत्रात २० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून, २० वर्षांत बँकिंग व हौसिंग फायनान्स क्षेत्रात ४० मिलीयन भांडवल केंद्रित होणार आहे. त्यामुळे बँकांमध्येही संपत्ती व्यवस्थापनासाठी खास व्यवस्थापकाची नेमणूक करावी लागणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी प्रा. अनुराधा गुरव, प्रा. नवनाथ शिंदे, डॉ. सतीश घाळी यांच्यासह संचालक, शाखाध्यक्ष, शाखा सल्लागार, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष प्रा. आर. एस. निळपणकर यांनी स्वागत केले. किरण पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला. प्रा. अनिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रा. डॉ. संभाजी भांबर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

‘रवळनाथ मॉडेल’ जगभर पोहोचेल
हौसिंग फायनान्स क्षेत्रात ‘रवळनाथ’ने अल्पावधीत खूप मोठे काम केले आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून त्याला नावीन्याची जोड दिल्यास मध्यम वर्गीयांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘रवळनाथ मॉडेल’ नक्कीच जगभर पोहोचेल, असा विश्वासही डॉ. जुगळे यांनी यावेळी व्यक्त केला.

मेक इन नव्हे, मेक फॉर इंडिया
सध्या केंद्र सरकारचा देशभर 'मेक इन इंडिया'चा नारा सुरू असला तरी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी जगभरातील गुंतवणूक देशात येण्याकरिता 'मेक फॉर इंडिया'चा नारा देण्याची गरज आहे, अशी टिप्पणीही डॉ. जुगळे यांनी यावेळी केली.

Web Title: Opportunities for 'Housing Financing' in the Future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.