राज्यातील १३ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आयएएस होण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:09+5:302020-12-17T04:49:09+5:30
कोल्हापूर : सध्या ‘अप्पर जिल्हाधिकारी’ म्हणून काम करत असलेल्या राज्यातील १३ अधिकाऱ्यांना निवड सूची या वर्गातून ‘निवड श्रेणी गट ...
कोल्हापूर : सध्या ‘अप्पर जिल्हाधिकारी’ म्हणून काम करत असलेल्या राज्यातील १३ अधिकाऱ्यांना निवड सूची या वर्गातून ‘निवड श्रेणी गट अ’ या संवर्गात पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे या अधिकाऱ्यांना आता ‘आयएएस’ म्हणून पुढे सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन आदेशानुसार निवड श्रेणी पदोन्नती मिळालेल्या १३ जणांमध्ये कोल्हापुरात काम केलेल्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नंदकुमार काटकर हे कोल्हापुरात अप्पर जिल्हाधिकारी होते, सध्या ते मुख्यमंत्री कार्यालयात सहसचिव कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. दीपक नलवडे यांनी कोल्हापुरात निवडणूक अधिकारी म्हणून उत्तम काम केले नंतर ते मेडा (अपारंपरिक ऊर्जा विभाग) येथे होते, ते सध्या अमरावती विभागात महसूल उपायुक्त आहेत. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील खेबवडे (ता. करवीर) येथील रवींद्र खेबुडकर हे कोल्हापुरात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी होते. ते सध्या प्रतिनियुक्तीने विधान परिषदेचे उपसभापतीचे खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. सांगली महापालिकेत त्यांनी आयुक्त म्हणूनही काम केले आहे. शिवाजी कादबाने हे निवडणूक निर्णय अधिकारी होते, ते सध्या जालना येथे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष आहेत.