जुन्या चेहऱ्यांना दिलेली संधी महाडिकांच्या पथ्यावर

By admin | Published: April 22, 2015 12:08 AM2015-04-22T00:08:32+5:302015-04-22T00:28:27+5:30

राजाराम कारखाना विजय : कोरेंची साथ असूनही सतेज पाटलांनी लढविला एकतर्फी किल्ला

The opportunity given to old faces is on the path of Mahadik | जुन्या चेहऱ्यांना दिलेली संधी महाडिकांच्या पथ्यावर

जुन्या चेहऱ्यांना दिलेली संधी महाडिकांच्या पथ्यावर

Next

रमेश पाटील - कसबा बावडा
जुन्या सहकाऱ्यांना दिलेली संधी, हातकणंगले तालुक्यासह करवीरमध्ये मारलेली मुसंडी यामुळे राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांनी सलग पाचव्यांदा एकतर्फी विजय मिळाला. महाडिक यांची सत्ता हटविण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली. परंतु, त्यांना महाडिक यांचा बालेकिल्ला असणाऱ्या हातकणंगले तालुक्याने हात दिला नाही.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर काहीकाळ राजकीय विजनवासात गेलेल्या माजी मंत्री सतेज पाटील यांनी निवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी भेटी देऊन सभासदांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न घेत निवडणुकीची तयारी सुरू केली. प्रचार सभांमध्ये सभासदांना ‘हीच वेळ आहे परिवर्तनाची.... आता नाही तर कधीच नाही...’, अशी ‘भावनिक’ साद घातली.
या निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे यांचा सतेज पाटील पॅनेलला जरी पाठिंबा असला, तरी ते प्रचारात प्रत्यक्षात कोठेही दिसलेच नाहीत. त्यामुळे हातकणंगले तालुक्यात सतेज पाटील गटाला मुसंडी मारता आली नाही. त्यामुळे पाटील हे एकटेच मैदानात लढत राहिले. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनीही गावागावांत सभा घेऊन ‘परिवर्तन’ करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचा प्रभाव म्हणावा तसा पडला नाही. मागील निवडणुकीत सतेज पाटील यांना विनय कोरे, हसन मुश्रीफ, निवेदिता माने यांची मदत झाली होती. या निवडणुकीत तसे चित्र दिसले नाही.
आमदार महाडिक यांनी सुरुवातीला ही निवडणूक अगदी सहजपणे घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते नेहमी ‘राजाराम’ची निवडणूक ही एकतर्फी होणार असे म्हणत असतं. परंतु, जसजशी निवडणूक जवळ येईल, तसे महाडिक अधिक सावध झाले. पॅनेलची आखणी करताना बऱ्यापैकी ‘रोटेशन’ पद्धत अवलंबत संधी मिळालेल्या विद्यमानांपैकी काहींना थांबवत जुन्या सहकाऱ्यांना परत घेत पॅनेलपासून कोणी दुरावणार नाही, याची दक्षता घेतली. काहींना भविष्यात तुमच्याकडे पाहिले जाईल, असे आश्वासन देत विरोधी आघाडीस कोणी मिळणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली.
जे येतील त्यांना बरोबर घेत सतेज पाटील यांनी आपली लढाई सुरूच ठेवली. त्यांना करवीर, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत चांगली साथ मिळाली. दक्षिण मतदारसंघातील काही गावांतही त्यांना चांगली मते मिळाली. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यानेही त्यांना चांगली साथ दिली. याउलट महाडिकांनी करवीरमधील अनेक मोठ्या गावात मुसंडी मारत चांगले मताधिक्य घेत सत्ता ताब्यात ठेवली. प्रचाराच्या होत असलेल्या आरोपाने ते कधीही विचलित झाले नाहीत. उलट ‘राजाराम’वर आपलीच सत्ता येणार, असे ते नेहमीच ठणकावून सांगायचे आणि घडलेही अगदी तसेच.
या निवडणुकीतील दोन्ही पॅनेलला मिळालेल्या मतांचे आकडे पाहिले, तर १०० ते ३०० मतांच्या फरकाने महाडिक यांच्या पॅनेलने जागा जिंकल्या आहेत. जर निवडणूक एकतर्फी होती, असे महाडिक नेहमी म्हणत असले, तरी त्यांचे उमेदवार इतक्या कमी मताने कसे विजयी झाले? याचे आत्मचिंतन महाडिक यांना आता करावेच लागणार आहे. विजयानंतर आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते निवडणूक प्रचारात सभासदांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे. वेळेत उसाची तोड व्हावी आणि सरासरी इतर पाच कारखान्यांपेक्षा जादा दर मिळावा, एवढीच सभासदांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. वर्षभरात महाडिकांना सलग चौथ्यांदा यश मिळाले आहे.

Web Title: The opportunity given to old faces is on the path of Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.