सत्तारूढ पॅनलमधून नवोदिता घाटगे यांना संधी शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:46+5:302021-03-20T04:22:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे राजकारण नवीन वळण घेत असल्याने सत्तारूढ पॅनलमध्ये पहिल्यांदाच नवीन चेहऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे राजकारण नवीन वळण घेत असल्याने सत्तारूढ पॅनलमध्ये पहिल्यांदाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तब्बल दहा नवीन चेहऱ्यांचा समावेश होणार असून, विद्यमान सहा संचालकांनी वेगळी वाट धरल्याने गेल्या पंधरा-वीस वर्षांत पहिल्यांदा सत्तारूढ गटाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मोकळ्या झाल्या आहेत. नवीन चेहऱ्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत विजयापेक्षा सत्तारूढ गटाकडून उमेदवारी मिळविणेच कठीण असते. पारंपरिक चेहरे, २५ ते ३० वर्षे संचालकांनी ठाण मांडल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे कठीण असते. त्यातही आमदार, माजी आमदारांच्या घरातीलच चेहरे पॅनलमध्ये असल्याने सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळणे दुर्मीळ असायचे. मागील निवडणुकीत सत्तारूढ गटाकडून दोनच नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला मागासवर्गीय जागा दिल्याने तेथून के. पी. पाटील यांचे कार्यकर्ते विलास कांबळे यांना, तर अंबरीश घाटगे यांना ऐन वेळी नाकारल्याने त्या ठिकाणी बाळासाहेब खाडे यांना संधी मिळाली.
आता परिस्थिती वेगळी आहे. सत्तारूढ गटाला हादरा देत विश्वास पाटील, अरुण डोंगळे, जयश्री पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील-सरूडकर, विलास कांबळे व आ. राजेश पाटील यांनी विरोधी छावणीत प्रवेश केला आहे. त्यात संचालक मंडळाची संख्या १८ वरून २१ झाल्याने तीन जागा वाढल्या आहेत. विद्यमान सहा संचालक बाजूला गेले आणि तीन जागा वाढल्या व एक रिक्त अशा दहा जागांवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. यामध्ये गडहिंग्लजमधून सदानंद हत्तरकी यांचा समावेश होऊ शकतो. भाजपकडून सध्या स्वीकृत म्हणून बाबा देसाई आहेत, त्यांना भुदरगडमधून संधी देऊन भाजपतर्फे नवोदिता समरजित घाटगे यांना महिला गटातून उमेदवारी दिली जाणार आहे.
‘करवीर’मध्ये उमेदवारी निवडीचा कस लागणार
‘गोकुळ’वर अनेक वर्षे संचालक राहिलेले आनंदराव पाटील-चुयेकर यांचे घराणे व माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सत्तारूढ गटापासून फारकत घेतल्याने सत्तारूढ गटाची गोची झाली आहे. सर्वाधिक ६४१ मतदान तालुक्यात आहे, त्यामुळे ताकदीचे उमेदवार रिंगणात उतरावे लागणार आहेत.
सत्तारूढ गटाकडून यांची उमेदवारी निश्चित-
चेतन नरके, रणजितसिंह पाटील, रवींद्र आपटे किंवा पद्मजा आपटे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, पी. डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, अंबरीश घाटगे, राजेश पी. पाटील, अमोल महाडिक, सत्यजित पाटील किंवा राजेंद्र सूर्यवंशी, सदानंद हत्तरकी, भारती विजयसिंह डोंगळे.