नेमबाज अभिज्ञाला ऑलिम्पिक अतिरिक्त कोटयासाठी संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:09 PM2020-07-19T22:09:04+5:302020-07-19T22:10:20+5:30
कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा पाटीलला २०२१ मध्ये होणाऱ्या टोकियो (जपान) ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तिला आता २५ मीटर स्पोर्ट पिस्तल या खेळप्रकारात येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन आपले मानांकन सुधारावे लागणार आहे.
कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा पाटीलला २०२१ मध्ये होणाऱ्या टोकियो (जपान) ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तिला आता २५ मीटर स्पोर्ट पिस्तल या खेळप्रकारात येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन आपले मानांकन सुधारावे लागणार आहे.
टोकियो २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या २०२१ मध्ये टोकियो येथेच होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अभिज्ञाने तीन ऑलिम्पिक निवड सराव चाचणी दिलेल्या होत्या. या ऑलिम्पिक निवड चाचणीमध्ये अभिज्ञाने चांगल्या गुणांची कमाई केल्यामुळे भारतीय नेमबाजी निवड समितीने निवडलेल्या चार खेळाडूंच्या प्राथमिक संघामध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे अभिज्ञाला ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची संधी प्राप्त झाली आहे. तिला पुन्हा नवी दिल्ली येथे १ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या सराव शिबिरासाठी पाचारण केले आहे. यापूर्वी या प्रकारात राही सरनोबत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. अभिज्ञाला ही संधी मिळाली तर ती तिसरी कोल्हापूरकर होईल.
अभिज्ञा बालेवाडी क्रीडासंकुल येथे नेमबाजीचा सराव करीत होती. सध्या छत्रपती संभाजीराजे विभागीय क्रीडासंकुल, कोल्हापूर येथे ती सराव करीत आहे. ऑलिम्पियन नेमबाजी गगन नारंग, प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर साखरे, राही सरनोबत व आईवडिलांचे सहकार्य लाभत आहे.
ऑलिम्पिक पात्रतेची पुन्हा संधी मिळाली आहे. देशभरातील अनेक दिग्गजांमधून मिळालेल्या संधीचे सोने करीन.
-अभिज्ञा पाटील,
आंतरराष्ट्रीय नेमबाज