'जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी विनय कोरेंना द्या'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 01:06 PM2021-12-31T13:06:10+5:302021-12-31T13:13:06+5:30
जिल्ह्याच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वारणानगर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची संधी आमदार डॉ. विनय कोरे यांना मिळावी अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह जाधव यांनी केली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील यांच्याशी समन्वय करीत जिल्ह्याच्या प्रमुख संस्थेत सत्ता कायम राखण्यात आमदार विनय कोरे यांनी योगदान दिले आहे. गोकुळ व विधान परिषद निवडणुकीतदेखील कोरे यांनी मुश्रीफ व पाटील यांना मदत केली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी आ. महादेवराव महाडिक, आ. प्रकाश आवाडे यासह अनेक गटांत समन्वय करून जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर व्हावा यासाठी आ. विनय कोरे यांच्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. यासाठी निवडणुकीनतंर बँकेच्या होणाऱ्या अध्यक्षपदासाठी विनय कोरे यांचा सत्ताधारी शाहू पॅनेलने विचार करावा, असेही विजयसिंह जाधव यांनी सांगितले.
वारणा उद्योग समूहाची यशस्वी जबाबदारी पार पाडत असलेले आमदार कोरे हे सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या अनुभवाचा बँकेला निश्चितच उपयोग होईल, तसेच आ. विनय कोरे यांच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्याला दीर्घकालानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास व हा निर्णय शाहू पॅनेलने घेतल्यास जिल्ह्यात त्यांचे स्वागत होईल, असेही ज्येष्ठ नेते विजयसिंह जाधव यांनी सांगितले.