कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्याची संधी

By admin | Published: June 17, 2016 12:16 AM2016-06-17T00:16:14+5:302016-06-17T00:40:51+5:30

संभाजीराजे छत्रपती : माझ्या नियुक्तीमुळे करवीरकरांचा सन्मान, ‘लोकमत’ परिवारातर्फे सत्कार

The opportunity to solve the problems of Kolhapur | कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्याची संधी

कोल्हापूरचे प्रश्न सोडविण्याची संधी

Next

कोल्हापूर : सत्तेत नसताना आपण सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता प्रयत्न करत राहिलो. आता ‘राष्ट्रपती नियुक्त खासदार’ म्हणून या प्रयत्नांच्या सोडवणुकीसाठी नक्कीच बळ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या संधीचा लाभ प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी केला जाईल, अशी ग्वाही नवनियुक्त खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी ‘लोकमत’ परिवाराशी बोलताना दिली.
खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी सकाळी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास भेट देऊन ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर ‘लोकमत’च्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी ते बोलत होते.
प्रारंभी ‘लोकमत’ कोल्हापूरचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांनी युवराज संभाजीराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
‘मी जो काही घडलो त्याचा मुख्य पाया हा माझ्या सामाजिक कार्याचा आहे आणि माझ्या या सामाजिक कार्याला ‘लोकमत’ने नेहमीच पाठिंबा दिला,’ असा गौरवपूर्ण उल्लेख युवराज संभाजीराजे यांनी केला. आपली खासदारपदी झालेली नियुक्ती हा केवळ माझाच नाही तर तो करवीरकरांचा सन्मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू छत्रपती यांच्या विचारांचा हा सन्मान आहे, मी एक निमित्तमात्र आहे, असेही ते म्हणाले.
कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्याची संधी या निमित्ताने आपणास मिळाली आहे.
मिळालेल्या संधीचा लाभ हा कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी केला जाईल, असे सांगून ते म्हणाले की, ‘कोल्हापूरच्या विमानतळाचा विस्तारीकरणासह विमानसेवेचा विषय हा स्थानिक पातळीवरच अडकलेला आहे. आपण लवकरच खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा करून स्थानिक ग्रामपंचायतींचा ‘ना हरकत दाखला’ मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
एकीकडे विमानसेवा सुरू झाली पाहिजे म्हणायचे आणि दुसरीकडे अशी अडवणूक होत असताना आपण काहीच करायचे नाही, हे योग्य होणार नाही. कोल्हापूरच्या विकासाकरिता विमान सेवा सुरू होणे अत्यंत
महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)



पंतप्रधानांचा निरोप : अशा घडल्या घडामोडी
राष्ट्रपतींकडून खासदार म्हणून नियुक्तीची घोषणा होण्यापूर्वीच्या घडामोडी संभाजीराजेंनी सांगितल्या.
ते म्हणाले, ‘एके दिवशी अचानक आपणाला पंतप्रधान कार्यालयातून पंतप्रधानांच्या सचिवांचा फोन आला. ‘पंतप्रधानांना भेटायला या’ असा निरोप दिला होता. ठरल्याप्रमाणे पंतप्रधान मोदींना त्यांच्या निवासस्थानी भेटलो.
चर्चेत त्यांनी ‘देवेंद्रजी आपको सन्मानित करना चाहते हैं, आपके सहमती के बाद प्रेसिडेंट को शिफारीश करूंगा’, असे पंतप्रधानांनी सांगितले. मीही त्याक्षणी होकार देऊन टाकला. कारण हा सन्मान माझा नाही, तर छत्रपती शिवाजी, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आहे, याची जाणीव झाली.
त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमंत्रण द्यायला गेलो, पण तेव्हा खासदारकीच्या विषयावर चर्चा झाली नव्हती.


पाच किल्ले प्रथम घ्या
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पाचशे कोटींचा निधी जाहीर झाला आहे, संवर्धनाच्यादृष्टीने नेमक्या कोणत्या कल्पना आहेत, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, राज्यातील रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा आणि शिवनेरी असे पाच किल्ले पथदर्शी प्रकल्प म्हणून विकसित करावेत, अशी सूचना आहे. या किल्ल्यांच्या परिसरातील रस्त्यांसह पर्यटकांना पायाभूत सुविधा दिल्या जाव्यात. त्यापाठोपाठ त्या किल्ल्यांचा इतिहास सांगणारे म्युझियम तयार केले जावे, पाच किल्ल्यांच्या भोवतीच्या खेड्यांना प्राथमिक सुविधा दिल्या जाव्यात, अशी आपली कल्पना आहे.


बहुजनांना जोडण्याचे काम करू
खासदार संभाजीराजे म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट आहे. योग्य-अयोग्य तसेच किती टक्के आरक्षण द्यावे हे आता न्यायालय सांगेल. मी बहुजनांचा नेता आहे. मराठा आरक्षण हा त्या भूमिकेतील एक मुद्दा आहे. शाहूंच्या विचारातील बहुजन समाजाला मला जोडायचे आहे. जातीय विषमता कमी करायची आहे. त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.


‘लोकमत’तर्फे शुभेच्छा... छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर गुरुवारी त्यांनी ‘लोकमत’च्या कोल्हापूर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी अमर पाटील, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ) संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील उपस्थित होते.

Web Title: The opportunity to solve the problems of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.