कृष्णाकाठावरून अमृत योजनेला विरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:40 AM2018-06-04T00:40:16+5:302018-06-04T00:40:16+5:30
उदगाव : इचलकरंजीला पाणी देण्याविरोधात कोथळी येथे रविवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. कोथळी-हरिपूर संगमातून मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, असा एकमुखी ठराव या बैठकीत करण्यात आला. रविवारी गाव बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोथळी (ता. शिरोळ) येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांमध्ये सकाळी अकराच्या सुमारास बैठकीस सुरुवात झाली. यावेळी संजय नांदणे म्हणाले, कोथळी हे क्रांतिकारकांचे गाव आहे. कृषी संपन्नता असलेले व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे चळवळीतील गाव आहे़ दानोळीनंतर कोथळीकरही ही योजना एकीच्या बळावर हाणून पाडतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील म्हणाले, शासनाने अमृत योजना रद्द करण्याऐवजी तडजोडीचे धोरण स्वीकारले आहे़ त्यामुळे कृष्णा नदीतून काही झाले तरी मजरेवाडीपर्यंत पाणी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी वारणा बचाव समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, कोथळीजवळच्या संगमातूनच पाणी घेण्याचे अद्याप निश्चित नसतानाही अधिकारी येऊन पाहणी करतात, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे दानोळीप्रमाणेच कोथळीकरांच्या पाठीमागेही खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले.
सावकार मादनाईक म्हणाले, पंचगंगेचे पाणी दूषित झाल्यामुळे हे पाणी पिण्याला तर सोडाच, शेतीलासुद्धा पाजायच्या लायकीचे राहिलेले नाही़ वारणेचे पाणी घेऊन पुन्हा वारणा दूषित करण्याचा डाव शासनाने आखला आहे. या योजनेच्या कामावर होणारा खर्च प्रशासनाने शुद्धिकरणासाठी खर्च करावा, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस पं. स. सदस्य राजगोंडा पाटील, सरपंच अमृता पाटील, उपसरपंच सागर पुजारी, धनगोंडा पाटील, देवगोंडा पाटील, बाहुबली इसराण्णा, दिलीप पाटील, सर्जेराव शिंदे, मानाजीराव भोसले, शीतल पाटील-धडेल, बापूसो दळवी, केशव राऊत, प्रसाद धर्माधिकारी, सतीश मलमे, विद्याधर कर्वे, विजय पाटील, सुकुमार नेजकर, भीमगोंडा बोरगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ वृषभ पाटील यांनी आभार मानले.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
कोथळी संगमावरून अमृत योजना नेली तर पुढील गावांना सांगलीच्या शेरी नाल्याचे पाणी प्यावे लागणार आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहराबरोबरच दोन्ही बाजूच्या गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असून, पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीत सांगितले.
बैठकीतील ठराव
संगमालगतच्या शेतजमिनी कोणीही योजनेसाठी देणार नाही.
गावावर कोणतेही संकट आल्यास भोंगा वाजवून सूचना देणे.
कोथळी हद्दीतून योजनेस विरोधाचा गावसभेत ठराव करणे.
यापुढे चर्चा नाही, पाणीही नाही. त्यामुळे ही पहिली व शेवटची बैठक.