रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णया विरोधात सह्यांची मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:27 PM2019-01-21T13:27:26+5:302019-01-21T13:39:36+5:30
राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील रिक्षा स्क्रॅप करण्याच्या निर्णया विरोधात सोमवारी बिंदू चौकात महाराष्ट्र वाहतूक सेना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्यावतीने सह्यांची मोहिमेस प्रारंभ केला.
कोल्हापूर : राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील रिक्षा स्क्रॅप करण्याच्या निर्णया विरोधात सोमवारी बिंदू चौकात महाराष्ट्र वाहतूक सेना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्यावतीने सह्यांची मोहिमेस प्रारंभ केला.
प्रदूषण करणाऱ्या वाहनांमुळे वातावरणात कार्बन मोनोआॅक्साईड व कार्बन डायआॅक्साईड हे दोन विषारी वायू सोडले जातात. हे दोन वायू मानवी शरीरास घातक समजले जातात. त्यामुळे जागतिक तापमानातही वाढ होत आहे. त्यानुसार राज्यातील अशा प्रदूषण करणाऱ्या वाहनामध्ये बी. एस. २ च्या रिक्षांचा समावेश यात करण्यात आला. त्यास अनुसरून राज्यात हा निर्णय घेण्यात आला. मात्र आपली जुनी रिक्षा स्क्रॅप करून नवीन रिक्षा खरेदी करणे सामान्य रिक्षा चालकांच्या आवाक्यांच्या बाहेर आहे.
यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होऊन अनेक कुटूंबियांचा उदरनिर्वाहांचा प्रश्न निर्माण होणार आहे. हा निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी ही सह्यांची मोहिम सुरु केली. सुमारे दहा हजार रिक्षा चालकांच्याकडून सह्या घेवून, यांची प्रत शासनाला पाठविण्यात येणार आहे.
इतर वाहनेही याच नियमानुसार स्क्रॅप करा. ज्या रिक्षा स्क्रॅप करणार त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जाधव,महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्राकांत भोसले, दिनेश परमार, दिलीप सुर्यवंशी, वसंत पाटील, रमेश पोवार, धनाजी यादव, विनायक पत्रावळे, भारत पाटील, साहेबराव पोवार, राजू कापूसकर, धनाजी यादव आदी उपस्थित होते.