पक्षात राहून विरोधी प्रचार चालणार नाही, पदाचा राजीनामा द्यावा लागेल; मंत्री चंद्रकांत पाटील यांची सक्त ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 02:16 PM2024-03-22T14:16:49+5:302024-03-22T14:19:57+5:30
भोगावती : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक नावाची घोषणा ही फक्त दिल्लीवरूनच केली जाईल. नाव कोणाचे आहे, हे महत्वाचे नसून आपला ...
भोगावती : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक नावाची घोषणा ही फक्त दिल्लीवरूनच केली जाईल. नाव कोणाचे आहे, हे महत्वाचे नसून आपला उमेदवार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन करत ज्यांना विरोधी प्रचार करावयाचा आहे. त्यांनी पहिला पक्षाचा राजीनामा ठेवावा आणि मगच विरोधात काम करावे, अशी सक्त ताकीद राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.
राधानगरी तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रविश उदयसिंह पाटील कौलवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या शेतकरी व युवक मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
मंत्री पाटील पुढे म्हणाले, राज्यातील उमेदवारांची निवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून केली जाईल. जे पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करतील त्यांनाच या निवडणुकीत संधी देतील. उमेदवार कोण आहे, चिन्ह कोणते आहे. यापेक्षा पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान पदावर विराजमान करावयाचे आहे. या ध्येयाने काम करा, असे आवाहन केले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसवाल्यांच्याकडून एवढ्या छोट्या कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी एवढे मोठे व्यासपीठ केले. म्हणून खिल्ली उडवली जात आहे. मात्र रविश पाटील हे छोटा पॅकेट मे बडा धमाका आहेत, भाजपचे काम करण्यासाठी संधी दिली जाते. वर्षानुवर्षी गरिबी हटाव हा एकच नारा घेऊन राहुल गांधी आज देखील भारत जोडो यात्रा करत आहेत. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना काँग्रेसचा हा नेता भटकत आहे. अशा दिशाहीन झालेल्या काँग्रेसला कंटाळून तरुण मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्यामार्फत कधी एवढा निधी जिल्ह्याला मिळाला नाही, तो मिळाला असून विमानतळ, रेल्वे स्टेशन यांचा चेहरामोहरा बदलला.
रविश पाटील म्हणाले, गेल्या तीन पिढ्यांच्यापासून आम्ही काँग्रेसमध्ये झोकून काम केले. मात्र सातत्याने आमचे खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. गोकुळ दूध संघ, भोगावती साखर कारखाना निवडणुकीत तर आमच्यासोबत उघड विश्वासघात केला. अशा विश्वासघातकी प्रवृत्ती सोबत राहण्यापेक्षा स्वाभिमानाने राहणे पसंत करीन, ही भाजपची विचारसरणी पटली म्हणून जाहीर प्रवेश करत आहे.
डॉ. सुभाष जाधव यांनी स्वागत तर नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी जिल्हा अध्यक्ष समरजीत घाटगे, बिद्रीचे संचालक राहुल देसाई यांची भाषणे झाली. लहू जरग, राहुल चिकोडे, माजी आमदार भरमूअण्णा पाटील, संभाजी आरडे, राधानगरी तालुका अध्यक्ष विलास रणदिवे, महिला तालुकाध्यक्ष सविता पाटील, ऋतुजा पाटील, करवीर तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, हंबीरराव पाटील आदी उपस्थित होते. दीपक शिरगावकर यांनी आभार मानले.