नेतृत्वावरून विरोधकांत दुफळी ?
By admin | Published: June 29, 2015 12:16 AM2015-06-29T00:16:04+5:302015-06-29T00:16:04+5:30
कुंभी-कासारी कारखाना निवडणूक : विरोधकांच्या बैठकीत शाहू आघाडी, बचाव मंचमध्ये दरी स्पष्ट
प्रकाश पाटील ल्ल कोपार्डे -कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या २०१५ ते २०२०च्या निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत विरोधकात शाहू आघाडी व बचाव मंच अशी दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये प्रस्थापितांपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्व द्या, अशी बचाव मंचची संकल्पना स्पष्टपणे फेटाळताना राजकारण आणि काम यांच्यामध्ये फारकत असून राजकीय प्रतिमा असलेल्यांनाच नेते म्हणा, असा रेटा प्रस्थापितांनी लावल्याने कार्यकर्त्यांनी खडेबोल सुनावले. यातूनच सत्ताधारी आमदार चंद्रदीप नरके गटाला एकसंध होऊन सत्तेतून पायउतार करण्याची योजना विरोधक पूर्ण करणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चंद्रदीप नरके यांनी २००४ मध्ये कुंभी-कासारीवर सत्ता मिळविल्यानंतर सलग दहा वर्षे एकतर्फी सत्ता मिळविताना करवीरची आमदारकीही दोन वेळा आपल्या ताब्यात ठेवली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील पाच मतदारसंघ व पंचायत समितीच्या दहा मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकावला.
सध्या २०१५ ते २०२० साठी कुंभीची निवडणूक होऊ घातली असून कोणत्याही परिस्थितीत आमदार चंद्रदीप नरके यांचे सत्ताकेंद्र हस्तगत करण्याचा चंग विरोधकांनी बांधला असला तरी यासाठी लागणारे एकजुटीचे नेतृत्व ही कुमकुवत बाजू विरोधकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुडित्रे येथे झालेल्या बैठकीत नेतेपदाचा मुद्दाच प्रकर्षाने चर्चेला गेला. निवडणुकीमध्ये कोण उमेदवार, कोणत्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवयाची, कोणती कामे सभासदापर्यंत घेऊन जायची, विरोधकांची कोणती चूक सभासदांपुढे आणल्यास त्याचा फायदा होईल. यापेक्षा मी नेता की तू नेता यावरच चर्चा होऊन दोन टोके विरोधकांत निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी एक नेता, राजकीयदृष्ट्या स्वच्छ चारित्र्य, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने सभासदांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेतृत्व व प्रस्थापितांनी जरा बाजूला राहून नवीन चेहरे द्यावेत यासाठी चर्चा उपस्थित केली. मात्र, प्रस्थापितांनी या संकल्पनेला राजकीयदृष्टया फार महत्त्व नसते. तेव्हा फक्त राजकीय प्रतिमा असणाऱ्यांनाच नेतृत्व देऊ असे सांगताच विरोधी सत्ताधारी गट एका व्यक्तीच्या नेतृत्वाखाली चालत असताना हे आपल्यला का शक्य होत नाही, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. सत्तेत नसताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व हवे. केवळ निवडणुकीसाठी ही मंडळी आल्यास १९९८ ते २००४ मध्ये पाच वर्षांतील पाच चेअरमन ही प्रतिमा आणून आमदार चंद्रदीप नरके आपले सत्तेचे स्वप्न साध्य करणार अशी भीती व्यक्त करण्यात आली.
यासाठी ज्या व्यक्ती लोकांमध्ये डागाळलेल्या व्यक्तीत गणल्या जातात त्यांना थांबवून नवीन चेहरे दिल्यास विजय लांब नाही असा विचार मांडताना बचाव मंचने लोकशाही प्रक्रिया राबवून उमेदवार निवडीला प्राधान्य देऊ, अशी संकल्पना मांडली. मात्र, यावेळी काही प्रस्थापित मंडळीनी राजकारण आणि काम यांची गल्लत करू नका. निवडणुकीसाठी राजकीय प्रतिमा असणारे नेतृत्वच द्यावे असा रेटा लावल्याने विचार आणि स्वार्थ यातील संघर्ष चव्हाट्यावर आला.