काळम्मावाडी ग्रामपंचायतीला विरोध
By admin | Published: December 7, 2015 11:53 PM2015-12-07T23:53:31+5:302015-12-08T00:43:48+5:30
उदगाव ग्रामस्थांचा निर्णय : शासनाच्या अधिसूचनेवर हरकती घेणार
संतोष बामणे -- जयसिंगपूर --उदगाव (ता. शिरोळ) येथे दूधगंगा प्रकल्पग्रस्तांची काळम्मावाडी वसाहत म्हणून अस्तित्वात असली तरी शासनाच्या नव्या धोरणानुसार काळम्मावाडी वसाहतीसाठी नवे गाव म्हणून ओळख होणार आहे. मात्र, नव्या गावाच्या शासन धोरणाला खुद्द काळम्मावाडी वसाहतीतील ग्रामस्थांचा विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे.
उदगाव येथे दूधगंगा प्रकल्पग्रस्तांची काळम्मावाडी वसाहत अनेक वर्षांपासून स्थापन झाली आहे. या उदगाव गावच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षांपूर्वी संभाजीपूर परिसराचा भाग होता. मात्र, उदगाव गावचा विस्तार वाढल्याने स्वतंत्र संभाजीपूर ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे.
सध्या उदगाव कार्यक्षेत्रात दूधगंगा प्रकल्पग्रस्तांची काळम्मावाडी वसाहत आहे. या वसाहतीच्या परिसराला उदगाव ग्रामपंचायतीकडून नागरी सुविधा पुरविल्या जात आहेत. परंतु, शासनाच्या नव्या धोरणानुसार काळम्मावाडीच्या परिसराला स्वतंत्र ग्रामपंचायतीचे रूप देण्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या पुनर्वसित वसाहतीचे महाराष्ट्र शासनाकडून महसुली गाव म्हणून जाहीर करण्याबाबत अधिसूचना जाहीर झाली असून, येत्या २३ डिसेंबरपर्यंत शासनाने हरकती मागविण्यात आल्या आहेत. याबाबत उदगाव ग्रामपंचायतीसह तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयास जाहीर अधिसूचनाचे पत्र उपलब्ध झाले आहे.
उदगाव ग्रामपंचायतीकडून काळम्मावाडी वसाहतीमधील ८५० नागरिकांकरिता आरोग्य उपकेंद्र नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय पाणी, वीज, रस्ते यासह मूलभूत सुविधा उदगाव ग्रामपंचायतीने उपलब्ध केल्या आहेत. तसेच उदगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपदही काळम्मावाडी वसाहतीमधील महिला भूषवित आहे. मग या काळम्मावाडी वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत का? कशासाठी? असा सवाल करून खुद्द काळम्मावाडी वसाहतीमधील नागरिक करीत असून, यास तीव्र विरोध दर्शविला आहे. जनमताचा कौल लक्षात घेऊन शासनाने स्वतंत्र काळम्मावाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्यापेक्षा उदगाव ग्रामपंचायतीला जादा निधी देऊन गावच्या विकासाला चालना द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे ८५० लोकसंख्या असलेल्या उदगाव काळम्मावाडी वसाहतीला महसुली गाव म्हणून जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाला ग्रामस्थांचा विरोध मात्र तीव्र आहे.
संभाजीपूरनंतर आता पुन्हा उदगाव हद्दीत असणारा काळम्मावाडी वसाहतीचा परिसर स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे उदगाव ग्रामपंचायतीचे महसुली व कर रूपाने जमा होणारे लाखो रुपयांचे उत्पन्न घटणार आहे. शिवाय ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतही त्यात असल्यामुळे ग्रामपंचायतीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
उदगाव ग्रामपंचायतीने सन्मानाचे सरपंचपद आमच्या वसाहतीला दिले आहे. शिवाय सर्व सोयीसुविधा ग्रामपंचायतीने दिल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यास ग्रामस्थांचाच विरोध आहे. शासनाने जनतेचा लोकभावनेचा विचार करून स्वतंत्र ग्रामपंचायत करू नये.
- स्वाती पाटील, सरपंच, उदगाव
उदगाव ग्रामपंचायतीकडून सर्व सुविधा काळम्मावाडी वसाहतीला मिळत आहेत. गतवर्षी ग्रामपंचायतीच्या सभेत या वसाहतीचे स्वतंत्र ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर करण्यास विरोध करणारा ठराव झाला आहे. तसेच या वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायतीची गरज नसून, शासनाकडे हरकती दाखल करणार आहोत. - संजय पाटील, माजी उपसरपंच, उदगाव
शासनाच्या नव्या धोरणानुसार काळम्मावाडीच्या परिसराला स्वतंत्र ग्रामपंचायतीचे रूप देण्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
येत्या २३ डिसेंबरपर्यंत शासनाने याबाबत नागरिकांकडून हरकती मागविल्या आहेत.
याबाबत खुद्द काळम्मावाडी वसाहतीमधील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
जादा निधी देवून उदगावलाच चालना देण्याची मागणी