विरोधकांत नगराध्यक्ष उमेदवारीचा तिढा कायम
By admin | Published: October 14, 2016 01:10 AM2016-10-14T01:10:49+5:302016-10-14T01:12:47+5:30
इस्लामपूर नगरपालिका : आघाडीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील; राजकीय हालचाली गतिमान
अशोक पाटील-- इस्लामपूर --आगामी इस्लामपूर पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीविरोधात भाजप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी आणि इतर घटक पक्षांची विस्कटलेली मोट बांधण्यात खासदार राजू शेट्टी यशस्वी झाले आहेत. मात्र जनतेतून निवडून द्यायच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही कायम आहे. या आघाडीसंदर्भात गुरुवारी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आघाडीला हिरवा कंदील दाखवला.
पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी गेल्या ३० वर्षांत विरोधकांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. निवडणूक तोंडावर आल्यानंतरच विरोधकांची मोट बांधण्याची तयारी सुरु होते. याचा फटका त्यांना निवडणुकीत बसतो. आगामी निवडणुकीतही तशीच परिस्थिती आहे.
प्रारंभीच्या टप्प्यात भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमधील नेत्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली होती. त्यानंतर महाडिक युवा शक्तीने मेळावा घेऊन सन्मानजनक तोडगा निघाला तर आघाडी करू अथवा स्वबळावर लढू, असा इशारा दिला होता. त्यानंतर दोनच दिवसात राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सर्व विरोधकांना एकत्र करत बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी विक्रम पाटील, आनंदराव पवार, वैभव पवार यांनी इच्छुक असल्याचे सांगितले. परंतु या विषयावर बोलणे टाळत शेट्टी यांनी अगोदर एक व्हा, नंतरच यावर तोडगा काढू, असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादीतून पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. आ. जयंत पाटील यांचा निर्णय अंतिम असेल. पाटील यांच्याविरोधात विरोधकांत खमक्या नेतृत्वाचा अभाव असल्याने शेट्टी यांनी उमेदवार निवडीसंदर्भात सावध भूमिका घेतली आहे.
गुरुवारी मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी खा. शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आघाडीबाबत माहिती दिली. यावेळी निवडणुकीत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.