बेळगावच्या नामांतरास विरोध
By admin | Published: February 16, 2015 12:18 AM2015-02-16T00:18:26+5:302015-02-16T00:20:50+5:30
शट्टीहळ्ळीतील साहित्य संमेलनात ठराव : संकटे थोपविण्याची ताकद साहित्यात : काळे
नेसरी : लेखक साहित्यातून खऱ्या माणसाचा शोध घेत असतो. प्रसूतीच्या वेदनेपेक्षाही गरिबीच्या वेदना खूप असतात. चारही बाजूंनी येणाऱ्या संकटांना थोपविण्याची ताकद साहित्यात दडली आहे. तेव्हा ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश ज्येष्ठ साहित्यिक वामन काळे यांनी दिला. सीमाभागातील शट्टीहळ्ळी (ता. हुक्केरी) येथील दुसऱ्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जि. प.च्या माजी सदस्या अंजना रेडेकर, मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष पिराजी पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या संमेलनात बेळगावच्या नामांतरास विरोध करण्याचा ठराव करण्यात आला.
बाळासो कालकुंद्रीकर यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. लेझीम, झांजपथक, धनगरी ढोलांच्या निनादात दिंडी काढण्यात आली. यानंतर बाबासाहेब कुपेकर साहित्यनगरीचे उद्घाटन एम. टी. कळविकट्टे यांच्या हस्ते, तर व्यासपीठाचे उद्घाटन उद्योजक शिवाजीराव कळविकट्टे यांच्या हस्ते झाले. लेखक वामन काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन संमेलनास प्रारंभ झाला. अध्यक्षीय भाषणानंतर डॉ. विठ्ठलराव भांदुर्गे व डॉ. शशिकला भांदुर्गे या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.दुसऱ्या सत्रात कविसंमेलन झाले. प्रा. डॉ. चंद्रशेखर पोतदार, इंद्रजित घुर्ले, राजन कळविकट्टीकर, यांनी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिसऱ्या सत्रात चन्नमा विद्यापीठ बेळगावच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी आजचा माणूस माणसांपासून हरवत चालला आहे या विषयावर मत मांडले.
चौथ्या सत्रात नागठाण्याचे हिम्मत पाटील यांनी ‘माती’ या कथेद्वारे ग्रामीण स्त्रियांच्या व्यथा, वेदना व चीड मांडली, तर बंडूची मुंज या विनोदी कथेद्वारे हशा पिकविला.
संमेलनातील ठराव
राज्य पुनर्रचनेत बहुभाषिक ८६५ खेडी कर्नाटकात डांबली गेली. मात्र, महाराष्ट्राने दाखल
केलेला न्यायालयातील दावा महत्त्वपूर्ण टप्प्यावर असून, न्यायालयाने खेडे हे घटक भाषिक, बहुसंख्य, भौगोलिक संलग्नता व लोकेच्छा या चतु:सूत्रीनुसार प्रश्न सोडवावा.
साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.
मराठी जनतेला कर्नाटक शासनाने भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सर्व शासकीय परिपत्रके, कागदपत्रे मराठी भाषेतून द्यावीत.
मराठी संस्कृती जपलेल्या बेळगावच्या नामांतरास विरोध.