सरसकट बंदला शिरोळमधून विरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:52+5:302021-04-08T04:23:52+5:30
जयसिंगपूर / शिरोळ / कुरुंदवाड: ब्रेक द चेन अंतर्गत सरसकट दुकाने बंदच्या नियमाबद्दल शिरोळ तालुक्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
जयसिंगपूर / शिरोळ / कुरुंदवाड: ब्रेक द चेन अंतर्गत सरसकट दुकाने बंदच्या नियमाबद्दल शिरोळ तालुक्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला आहे. तर ग्रामीण भागातून लहान-मोठ्या व्यावसायिकांतून संतापाची भावना व्यक्त होत आहे. सर्वच व्यवहार बंद करा, अन्यथा आमच्या पोटावर मारू नका, अशादेखील भावना ग्रामीण भागातून उमटत आहेत.
दरम्यान, बुधवारी जयसिंगपूर येथे व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवून प्रशासनाला निवेदन दिले.
विकेंड लॉकडाऊनच्या नावाखाली पूर्ण लॉकडाऊन अशी संभ्रमावस्था शिरोळ तालुक्यात निर्माण झाली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पोलीस प्रशासन देखील आवाहन करीत आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीही बंदबाबत संभ्रमावस्थाच होती. जयसिंगपुरात व्यापाऱ्यांनी बंद ठेवू नये, अशी भूमिका घेतली. मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. ग्रामीण भागातही बंदबाबत संमिश्र प्रतिसाद मिळाला. छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन बंद करू नये. वास्तविक उदरनिर्वाह असणारे व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी शासनाने द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
कुरुंदवाड शहर पूर्ण लॉकडाऊन करू नये, अशा मागणीचे निवेदन शहर नागरी हक्क समितीच्यावतीने नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी निखिल जाधव यांना देण्यात आले. गतवर्षी लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, मोलमजुरी करणारे आदी सर्वच घटकांचे आर्थिक हाल झाले आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी बरीच वर्षे लागणार आहेत. असे असताना शासनाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य घटकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शासनाने कडक लॉकडाऊन न करण्याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या भावना शासन, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत कळविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी नागरी हक्क समितीचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते.
फोटो - ०७०४२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शहर नागरी हक्क समितीच्यावतीने नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी निखिल जाधव यांना कडक लॉकडाऊन न करण्याबाबत निवेदन दिले.