नेसरीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यास विरोधकांची मोर्चेबांधणी

By admin | Published: January 9, 2017 11:34 PM2017-01-09T23:34:40+5:302017-01-09T23:34:40+5:30

दिग्गज येणार आमने-सामने : सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित; युती व आघाडीवरच राजकीय समीकरणे अवलंबून

Opposition's frontline for obstructing NCP's citadel | नेसरीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यास विरोधकांची मोर्चेबांधणी

नेसरीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्यास विरोधकांची मोर्चेबांधणी

Next

रवींद्र हिडदुगी -- नेसरी --स्व. बाबासाहेब कुपेकर यांना सरपंचपदापासून ते थेट विधानसभा अध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजविण्याची संधी दिलेल्या नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी खुले आरक्षण आल्याने सर्व पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, बाबांच्या पश्चात झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी व राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाला यावेळी मात्र झगडावे लागणार आहे. गत पाच वर्षांतील राजकीय स्थित्यंतरे व कुपेकर घराण्यात पडलेली उभी फूट पाहता नेसरी जि. प. मतदारसंघात विरोधकांची व्युहरचना सुरू आहे.
गत निवडणुकीत सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने मीनाताई जाधव (राष्ट्रवादी) व विद्याधर गुरबे यांच्या पत्नी कविता गुरबे (शाहू आघाडी) यांच्यात सरळ लढत होऊन जाधव या २३४१ मतांनी विजयी झाल्या होत्या. मात्र, तत्कालीन परिस्थितीची व आताची परिस्थिती फार बदललेली आहे. राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात पडलेली फूट व माजी आमदार स्व. तुकाराम कोलेकर यांच्या पश्चात शाहू आघाडीचाही ठावठिकाणा राहिलेला नाही. एकेकाळी ‘राष्ट्रवादी’च्या विरोधात सर्वपक्षीय मोट बांधून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न आता राहिला नसून, राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी शिवसेना, भाजप व काँगे्रसने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू ठेवली आहे.
गतवेळी शाहू आघाडीच्या माध्यमातून पंचायत समिती नेसरी मतदारसंघात यशस्वी झालेले आणि आता गडहिंग्लज तालुका भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनीही जि. प. साठी जोरदार तयारी चालविली आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी कोलेकर यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले असून, अन्य पक्षांतील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून पक्षीय ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात ते दिसत आहेत. कार्यकर्त्यांचे मेळावे, विविध विकासकामांचा प्रारंभ करून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गोडसाखरचे संचालक व राष्ट्रीय काँगे्रसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर गुरबे यांनीही आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामे आणली आहेत. ते एक संयमी कार्यकर्ते म्हणून परिचित असून, त्यांनी गावागावांत काँगे्रस कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. ते ही या निवडणुकीत अग्रसेर आहेत. कोणत्याही परिस्थतीत आपण जि. प. ची निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यंतरी शिप्पूर येथे कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा घेऊन, आमदार सतेज पाटील यांना राजकीय ताकदही दर्शविली होती.
विधानसभा पोटनिवडणुकीपासून आपल्या काकींशी लढणाऱ्या संग्रामसिंह कुपेकर यांनीही गावागावांत संपर्क ठेवून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. कानडेवाडी गावातही त्यांनी भगवा फडकविला आहे, तर अनेक कार्यकर्त्यांना सेनेत ओढून राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गत निवडणुकीत ‘अडकूर’ (ता. चंदगड) मधून जि. प. निवडणूक लढविली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत मिळालेली २५ हजारांहून अधिक मते आजमावता त्यांचा जनसंपर्क वाढला आहे. गावागावांत शिवसेनेच्या शाखा काढून सेनेचे कार्यकर्ते वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, ते आता नेसरी जि.प. मध्ये इच्छुक असल्याने त्यादृष्टीने त्यांची पावले पडत असून, मिनी विधानसभा पुन्हा एकदा गाठण्यासाठी संग्रामसिंह यांनी कंबर कसली आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून नेसरी मतदारसंघ प्रसिद्ध आहे. पण, राजकीय उलथापालथी, गट-तटाची समीकरणे पाहता माजी जि. प. सदस्य दीपकराव जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष तयारीत आहे. सध्या त्यांच्या पत्नी मीनाताई जाधव जि. प. सदस्य आहेत. संयमी नेतृत्व म्हणून दीपकराव जाधव यांचा परिचय आहे.
गडहिंग्लज पंचायत समिती सभापतिपदही त्यांनी भूषविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची मदार तूर्त तरी दीपकरावांवरच आहे. राष्ट्रवादीत अनेकजण इच्छुक असले तरी आमदार संध्यादेवी कुपेकर, दीपकराव जाधव यांनाच पुन्हा उभे करण्याच्या तयारीत असताना दिसत आहेत.
यापूर्वी काँगे्रस, शेकाप, शिवसेना-भाजप व स्वाभिमानी मिळून राष्ट्रवादीशी लढा देत होते. पण, आता राजकीय समीकरणे बदललेली असल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला शह देण्यासाठी काँगे्रस-शिवसेना व भाजप तयारीत आहेत. त्यामुळे यावेळची निवडणूक ही पक्षीय पातळीवरच लढविली जाईल.

संभाव्य उमेदवार
नेसरी जि. प. : दीपकराव जाधव (राष्ट्रवादी), संग्राम कुपेकर (शिवसेना), अ‍ॅड. हेमंत कोलेकर (भाजप) व विद्याधर गुरबे (काँगे्रस)
नेसरी पं. स. : मुन्नासाहेब नाईकवाडे, वैशाली पाटील, दयानंद नाईक (राष्ट्रवादी), भरमू जाधव -तावरेवाडी (भाजप), बबन पाटील, युवराज दळवी, एस. एन. देसाई (शिवसेना), अनिल पाटील (हडलगे), आशिष साखरे (नेसरी) - (काँगे्रस)
बुगडीकट्टी पं. स. : इंदुमती नाईक (हेब्बाळ जलद्याळ- इतर मागास महिला), सुनीता बाबूराव पाटील (हेळेवाडी)


खुले आरक्षण असल्याने एकदा मिळालेली संधी पुन्हा मिळेल की नाही, यासाठी सर्व पक्षांची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. मात्र, ही लढत दुरंगी होते की चौरंगी हे पाहावे लागेल.
संपूर्ण राजकीय समीकरणे युती व आघाडीवरच राहणार आहेत. राष्ट्रवादी व काँगे्रस पक्षाची वरिष्ठ पातळीवरून आघाडीचा आदेश झाल्यास व शिवसेना-भाजपमध्ये समेट झाल्यास उमेदवारीवरून पेच होऊ शकतो.

Web Title: Opposition's frontline for obstructing NCP's citadel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.