रौप्यनगरी हुपरीस सरकारकडून ‘अच्छे दिन’चा आशावाद
By Admin | Published: November 5, 2014 10:07 PM2014-11-05T22:07:16+5:302014-11-05T23:39:52+5:30
कामगारवर्गातून मागणी : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ द्यावा
तानाजी घोरपडे - हुपरी --रौप्यनगरी हुपरी व वस्त्रोद्योगनगरी इचलकरंजीच्या चांदी व यंत्रमाग कामगारांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्षात लाभ मिळवून देऊन हजारो कामगारांच्या आयुष्यात व त्यांच्या संसारात आनंद निर्माण करण्यासाठी नवनियुक्त सत्तारूढ भाजप सरकार तरी प्रयत्नशील राहणार काय? अशा चर्चा चांदी व यंत्रमाग कामगारांमधून केल्या जात आहेत. सर्वसामान्य गोरगरीब कामगारांच्या जीवनामध्ये सुखा-समाधानाचे व आनंदाचे क्षण निर्माण करण्याची जबाबदारी आता सहकार व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर आली आहे. या दोघांनी प्रयत्न करून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्षात लाभ मिळवून द्यावा, असा आशावाद कामगारवर्गातून व्यक्त केला जात आहे.हुपरी, रेंदाळ व इचलकरंजी परिसरामध्ये चांदीचे दागिने तयार करण्याबरोबरच यंत्रमाग व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. या दोन्ही व्यवसायामध्ये लाखाहून अधिक कामगार कार्यरत आहेत. यामध्ये पुरुषांबरोबरच महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. प्रतिदिन मिळणाऱ्या अत्यल्प मजुरीमुळे पती-पत्नी दोघांना राबून संसाराचा गाडा चालवावा लागतो. दिवसाकाठी मिळणारी अत्यल्प मजुरी व दसरा-दीपावली सण साजरे करण्यासाठी अंगावर मिळणारी बाकी (उचल) यापेक्षा त्यांना जास्त काही दिले जात नाही. दिवसभर बसून, वाकून काम केल्यामुळे चांदी कामगारांना व यंत्रमागावर दिवस-रात्र उभे राहून काम केल्यामुळे यंत्रमाग कामगारांना मानेचा, कंबरेचा, पाठदुखीचा, डोळ्यांचा आजार पाचविलाच पूजलेला आहे. या कामगारांना कशाचेही संरक्षण नाही की म्हातारपणीची तजविज म्हणून भविष्यनिर्वाह निधीबरोबरच विमा योजनेचे संरक्षण नाही. दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याच्यावर अवलंबून असणारे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. चांदी व यंत्रमाग व्यवसायातील कामगार आपले संपूर्ण आयुष्य ‘वेठबिगारीचे’ जिणे जगत असतो. अशा पद्धतीने हलाखीचे जीवन जगणाऱ्या या कामगारांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, हे काम कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यंतरी तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी या दोन्ही व्यवसायांतील कामगारांना लोककल्याणकारी महामंडळामध्ये समावेश करून त्यांना बांधकाम व घरेलू मोलकरीण वर्गाला मिळणाऱ्या सोयी-सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवस प्रयत्नही झाले. मात्र, पुढे आतापर्यंत काहीच झालेले नाही. नेहमीप्रमाणे शासनाच्या अनेक लोकहितकारक योजनांप्रमाणे ही योजनाही ‘लालफितीत’ अडकल्याचे चित्र आहे.याबाबत वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते कॅबिनेट बैठकीमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या सहायकांनी सांगितले. तसेच आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते भेटू शकले नाहीत.