शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेवर कर्जमाफीच पर्याय

By admin | Published: October 1, 2016 01:10 AM2016-10-01T01:10:49+5:302016-10-01T01:11:20+5:30

राजू शेट्टी : प्रसंगी सदाभाऊंच्या लाल दिव्याचा बळी देऊ !

The option of debt relief on farmers' disadvantage | शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेवर कर्जमाफीच पर्याय

शेतकऱ्यांच्या अस्वस्थतेवर कर्जमाफीच पर्याय

Next

कोल्हापूर : देशभरामध्ये शेतीशी संबंधित असलेल्या मराठा, पाटीदार, गुजर आणि जाट समाजांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे देश अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता संपवायची असेल तर कर्जमाफी हा एकच पर्याय आहे. वेळ पडली तर सदाभाऊंच्या लाल दिव्याचा बळी देईन; मात्र कोणत्याही परिस्थितीत २०१९ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
‘स्वाभिमानी’च्या कोल्हापुरातील संपर्क कार्यालयाचे शुक्रवारी दुपारी उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ‘स्वाभिमानी’चे हे जिल्हा संपर्क (पान १४ वर) कार्यालय सुरू करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनानिमित्ताने आजारपणातून बरे झालेले खोत पहिल्यांदाच कोल्हापूरात आल्याने कार्यक र्त्यांनी मोठी गर्दी केली.
शेट्टी म्हणाले, गुजरातमध्ये पाटीदार, राजस्थानमध्ये गुजर, हरियाणामध्ये जाट आणि महाराष्ट्रातील मराठा समाजात अस्वस्थता आहे. शेतीशी संबंधित असलेला हा समाज आहे. या समाजाचे दुखणे दारिद्र्यात आहे. त्याचमुळे देशभरातील शेतकरी नेत्यांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे फॉर्म भरले असून देशभरातून ५० लाख शेतकऱ्यांचे फॉर्म भरून ते पंतप्रधानांकडे देणार आहे. तीन टक्के सरकारी नोकरांसाठी सातव्या वेतन आयोगावर चर्चा न करता कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्यांना कर्जमुक्ती करायला भाग पाडणार आहे. त्यासाठी सदाभाऊंच्या लाल दिव्याचा बळी द्यायलाही मागे-पुढे पाहणार नाही.’
राज्यमंत्री खोत म्हणाले, दलाल बाजूला करून शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांना पुरविण्याच्या आठवडी बाजार योजनेवर अनेकांनी टीका केली. मात्र मुंबईत ही योजना यशस्वी ठरली. राज्यभरात ही योजना यशस्वी ठरत असून उद्या, रविवारी मुंबईत हुतात्मा चौकामध्ये हा आठवडी बाजार भरविणार आहे. तीन वर्षांचे ‘ठिबक’चे अनुदान गेल्या सरकारने दिले नव्हते. ते १२९ कोटी रुपये देऊन पुन्हा राज्यासाठी ४०८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील तीन लाख हेक्टरवर ठिबक सिंचन करण्यासाठी ‘नाबार्ड’कडून अडीच टक्के व्याजाने निधी देण्याचे धोरण ठरत आहे. आम्ही केलेली चांगली कामे लोकांसमोर मांडत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचीही तयारी करा.’
संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी प्रास्ताविक केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, हातकणंगले महिला तालुकाध्यक्ष मेघा चौगुले यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती सीमा पाटील, शिरोळच्या सभापती सुवर्णा अपराज, जिल्हा परिषदेचे सदस्य सावकर मादनाईक, सुरेश कांबळे, सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, दि. बा. पाटील, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
....................
राजू शेट्टी यांच्या घोषणा
- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी जिल्हा कार्यालयात थांबणार.
- पुढील वर्षीपर्यंत साडेपाच कोटींची सहकारी राईस मिल उभारणार
...................
यंदाचे आंदोलन खणखणीत
यंदा उसाची पळवापळवी होणार असल्यामुळे उसाच्या कांड्याला सोन्याचा भाव येणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी भंगाराच्या भावाने ऊस घालण्यासाठी गडबड करू नये. यंदाचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत खणखणीत करायचे आहे. तशी मानसिकता ठेवा, असे शेट्टी म्हणाले.
...................................
गड्यान्नावरांना धक्काबुक्की करणारे तुरुंगात जाणार
दौलत साखर कारखाना चालवायला देण्याचा व्यवहार संशयास्पद आहे. यासाठीच आमचे पदाधिकारी राजेंद्र गड्यान्नावर यांनी जिल्हा बॅँकेच्या वार्षिक सभेत प्रश्न विचारला, तर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ‘दौलत’चीच केस घेऊन मी न्यायालयात जाणार असून गड्यान्नावर यांना धक्काबुक्की करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल, असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला.
...............
काही लोकांना आम्ही काय करतोय याची शंका
मी आणि सदाभाऊ नेमके कुठे आहोत आणि काय करतो आहोत याबद्दल काही लोकांना शंका आहे, असे सांगत शेट्टी यांनी गेल्या दोन वर्षांत पाठपुरावा केलेल्या प्रश्नांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांतील गुन्ह्यांचे आकडे बघा. ‘स्वाभिमानी’च्या कार्यक र्त्यांवरच अधिक गुन्हे दाखल आहेत. आम्ही रस्त्यांवर उतरलो की आम्हीच सरकार आणल्यानं ते लगेच निर्णय घेतंय. ‘सेझ’मधून, एमआयडीसीतून शेतकऱ्यांची जमीन वाचवली, मुंबईतील जेएनपीटी बंदरासाठी जमीन घेतलेल्या शेतकऱ्यांना ११ टक्के भूखंड आम्ही मिळवून दिला. पोलिस अणि अधिकारी होण्याची वयोमर्यादा वाढवून घेतली. आम्ही कुणाच्या फायली घेऊन सरकारच्या तिजोरीवर दरोडे घालायला गेलो नाही. अजून आमच्या मिशीला कुणाचं खरकटं लागलं नाही, अशा शब्दांत शेट्टी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.


मराठा मोर्चाला पाठिंबा
महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आर्थिक दुखणे हे तोट्यातील शेतीमध्ये आहे. शिक्षणसम्राटांनी शिक्षण महाग केले असून, या समाजातील तळातील घटक दारिद्र्यातच खितपत पडला आहे. म्हणूनच मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले.

ऊस परिषद
२५ आॅक्टोबरला..
ऊस परिषद जयसिंगपूर येथे २५ आॅक्टोबरला होणार असल्याचे यावेळी शेट्टी यांनी जाहीर केले. याच परिषदेत अपेक्षित दर जाहीर करण्यात येणार असून, प्रथेप्रमाणे मोठ्या संख्येने परिषदेला हजर राहण्याचे आवाहन शेट्टी यांनी केले.

Web Title: The option of debt relief on farmers' disadvantage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.