मृतदेह दहनासाठी गॅसदाहिनीचा पर्याय
By admin | Published: April 19, 2017 01:04 AM2017-04-19T01:04:33+5:302017-04-19T01:04:33+5:30
महापालिकेत सादरीकरण : बडोद्याच्या कंपनीचा पुढाकार; खर्चासह प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : मृतदेह दहनावर होणारा खर्च आटोक्यात आणण्यासाठी तसेच त्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेसमोर गॅसदाहिनीचा पर्याय पुढे आला असून, त्याबाबत मंगळवारी बडोद्याच्या अल्फा इक्विपमेंट या कंपनीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. महापौर हसिना फरास, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेत हे सादरीकरण करण्यात आले.
कोल्हापुरात मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. पारंपरिक पद्धतीने लाकूड आणि गोवऱ्या (शेणी) यांच्यामार्फत एका मृतदेहासाठी दहनासाठी महापालिकेला सरासरी १२०० रुपये खर्च येतो. दरवर्षी महापालिकेच्या स्मशानभूमीत एकूण किमान ४५०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात; पण हा खर्च वाढत निघाल्याने पर्याय म्हणून गॅस दाहिनीचा पर्याय पुढे आला. त्याबाबत स्थायी समिती सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या अत्याधुनिक दाहिनीमुळे खर्चात कपात, प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे. याशिवाय कोणाच्याही भावनाही दुखावणार नाहीत, अशी ग्वाही बडोद्याच्या अल्फा इक्विपमेंट या कंपनीचे विहंग चव्हाण यांनी सादरीकरणावेळी दिली. कोल्हापूर महापालिका सध्या मृतदेहावर दहनासाठी करत असलेला खर्च तसेच कंपनीच्या गॅसदाहिनीमुळे मृतदेहावर दहनावेळी होणारा खर्च, प्रदूषणमुक्तीबाबत पॉवर पॉर्इंटद्वारे सादरीकरण केले.
सादरीकरणावेळी उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, परिवहन समिती सभापती नियाज खान, महिला बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, सभागृह नेते प्रवीण केसरकर, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, नगरसेवक राहुल चव्हाण, सचिन पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, सचिन चव्हाण, राहुल चव्हाण, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एक गॅसदाहिनी मोफत
चव्हाण हे मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असल्याने त्यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेस एक मोफत गॅसदाहिनी देण्याचेही या सादरीकरणावेळी मान्य केले आहे, पण या दाहिनीसाठी लागणाऱ्या गॅस खर्चाची जबाबदारी ही महापालिकेने उचलावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अल्फा इक्विपमेंट ही बडोदास्थित कंपनी असून गेली ३५ वर्षे डिझेल, गॅस, विद्युतदाहिनीचे प्रकल्प राबविते.
या कंपनीचे गुजरात येथे अनेक प्रकल्प कार्यरत आहेत. एका दाहिनीला सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
अशी असेल गॅसदाहिनी
प्रचलित पद्धतीपेक्षा अतिशय कमी खर्च गॅसदाहिनीमध्ये मृतदेह दहनावर येतो.
एक मृतदेह दहनासाठी किमान २५ किलो गॅस व व १० एच.पी. वीज खर्च होते, तर दिवसभरात ३ मृतदेह दहन केल्यास प्रत्येकी किमान ११ किलो गॅस खर्च होतो.
त्यापेक्षा जादा मृतदेहावर एका दिवसात दहन केल्यास त्याचा खर्च आणखी कमी होईल.
या गॅसदाहिनीमध्ये ५० फूट उंच चिमणी असल्यामुळे त्यापासून निघणाऱ्या धुराचा त्रास होणार नाही, त्यामुळे प्रदूषणमुक्तीसह हातभार लागणार आहे. मृतदेह दहनानंतर दोन तासांत दाहिनी आॅटोमॅटिक बंद होणार
आहे.
खर्चात ५० टक्के कपात :
कोल्हापुरातील लोकांच्या भावना लक्षात घेता कंपनीने लाकडावर आधारित दाहिनीही तयार केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामध्ये प्रचलित पद्धतीपेक्षा ५० टक्के खर्च कमी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बायोगॅसही वापरता येईल
रिंगरोडवर बोंद्रेनगर येथे महापलिकेच्यावतीने कचऱ्यापासून निर्माण होणारा बायोगॅस प्लँट आहे. हा बायोगॅस या योजनेसाठी वापरता येईल, असे सांगितले.