जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट, सावधानतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:39+5:302021-07-23T04:16:39+5:30
कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ ते २५ जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याअंतर्गत आज ...
कोल्हापूर : भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ ते २५ जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याअंतर्गत आज शुक्रवारी ‘ऑरेंज अलर्ट’चा इशारा दिला असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील सर्वच डोंगराळ भागामध्ये म्हणजेच चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड येथे ३०० मि.मी. व त्यापेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. करवीर, कागल, हातकणंगले व शिरोळमध्येही मोठा पाऊस झालेला आहे. त्यामुळे पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा व वेदगंगा या नद्या धोका पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून पाणी पातळीत ५ ते ६ फुटांनी वाढून परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे किंवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटनांची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.
--