कोल्हापूर जिल्ह्यात 23 जुलैला ‘ऑरेंज अलर्ट,नागरिकांना सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:31 PM2021-07-22T15:31:52+5:302021-07-22T15:32:33+5:30
Kolhapur Rain Update: भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. दि. 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
कोल्हापूर - भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. दि. 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
जिल्ह्यातील सर्वच डोंगराळ भागामध्ये म्हणजेच चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड या ठिकाणी 22 जुलैला सकाळी 8 वाजेपर्यंत 150 ते 200 मिमी किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे.
जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले व शिरोळ या तालुक्यांमध्येही 80 ते 125 मिमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा व वेदगंगा या नद्या आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इशारा पातळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार वरील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ संभवत असून पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फूटांची वाढ होवून दि. 23 जुलै रोजी सकाळी 10 वा. पर्यंत ही पाणी पातळी धोका पातळीस पोहचण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.