केशरी कार्डधारकांना धान्य मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:16+5:302021-06-22T04:18:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील केशरी कार्डधारकांची संख्या अधिक आहे. यातील ८ ते १० कुटुंबे गरीब असून त्यांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील केशरी कार्डधारकांची संख्या अधिक आहे. यातील ८ ते १० कुटुंबे गरीब असून त्यांचे वार्षिक उत्पन्न देखील खूप कमी आहे. त्यामुळे या केशरी कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांना दिले.
शहरातील ८ ते १० केशरी कार्डधारक कुटुंबे गरीब असून, त्यांचे वार्षिक उत्पन्नदेखील ५९ हजारांपेक्षा कमी आहे. त्यांना अन्नसुरक्षा योजनेतून धान्य मिळत नाही. या कुटुंबांनी गेल्यावर्षी दोन महिने प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य ८ व १२ रुपये प्रति किलो दराने रेशन दुकानातून घेतले आहे. अशा कुटुंबांना प्राधान्य लाभार्थी म्हणून अन्नसुरक्षा योजनेतून रेशन दुकान धान्य मिळणे गरजेचे आहे. गेले अडीच महिने लॉकडाऊन असल्याने या गरीब कुटुंबांना रोजगार नाही. महागाईमुळे त्यांची उपासमार होत असल्याने त्यांना पंतप्रधान योजनेतून मोफत धान्य मिळाले पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे. जर आमच्या मागण्या मान्य न केल्यास कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
शिष्टमंडळात दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सुभाष कांबळे, पार्वती जाधव आदींचा समावेश होता.