संदीप सुतारवर कारवाईचे आदेश
By admin | Published: September 19, 2014 11:36 PM2014-09-19T23:36:25+5:302014-09-20T00:22:46+5:30
दिलीप सावंत : धमकी प्रकरण; जिल्हाभरातून तीव्र निषेध
सांगली : ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक अविनाश कोळी यांना जिवे मारण्याची धमकी देणारा शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाईची प्रक्रिया सुरु असली तरी, त्याला प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करावी, असे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी विश्रामबाग पोलिसांना दिले आहेत.
सुतारने जिल्हाप्रमुख पदावर असताना शुभेच्छाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीपोटी त्याने ३५ हजारांचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश वठला नाही. त्यामुळे पुन्हा त्याने नव्याने धनादेश दिला. पण तोही वठला नाही. त्यामुळे ‘लोकमत’ने त्याच्याविरुद्ध सांगलीच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुतारची जिल्हा प्रमुखपदावरुन उचलबांगडी केली आहे. गेल्या आठवड्यात (१२ सप्टेंबर रोजी) कोळी यांना सुतारने मोबाईलवर संपर्क साधून, ‘तुझ्यामुळे माझे जिल्हा प्रमुखपद गेले आहे, तुला जिवंत ठेवणार नाही. तुला संपविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे’, अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करणारा एसएमएसही पाठविला होता. या प्रकारानंतर कोळी यांनी त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पुढे केला. त्यामुळे अटक करण्याऐवजी त्याला ७२ तासात पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस दिली. यामुळे त्याने न्यायालयातून जामीन मंजूर करुन घेतला आहे. पोलीसप्रमुख सावंत यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांच्याशी संपर्क साधून, तपास काय केला, याचा आढावा घेतला. त्यांनी सुतारला प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करून विशेष शाखेसमोर हजर करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
जतमध्ये कारवाईची मागणी
जतमध्ये पत्रकारांच्या बैठकीत संदीप सुतारचा निषेध केला. पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी जयवंत आदाटे, दिनराज वाघमारे, मनोहर पवार, मारुती मदने, किरण जाधव, भागवत काटकर, मच्छिंद्र बाबर, विजय नाईक, प्रकाश माळी, नारायण भोसले, अमित कुलकर्णी, संभाजी सावंत, विरपाक्ष येवले, अंकुश क्षीरसागर, केरप्पा हुवाळे, गजानन पतंगे, सुभाष हुवाळे उपस्थित होते.
सांगलीतही निषेध
जिल्हा मराठी पत्रकार संघ व वृत्तवाहिनी संघटनेने सुतारचा निषेध केला. सुतारवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवाजी कांबळे, रवींद्र कांबळे, आसिफ मुरसल, रॉबीन डेव्हीड, स्वाती चिखलीकर, राजेंद्र कांबळे, कुलदीप देवकुळे, अरूण मोडक, प्रवीण शिंदे उपस्थित होते.