हुपरी पालिकेच्या कार्यवाहीचे आदेश

By admin | Published: March 25, 2016 12:29 AM2016-03-25T00:29:58+5:302016-03-25T00:38:14+5:30

नगरपालिका मंजुरीवर शिक्कामोर्तब : ग्रामविकास मंत्रालयाचा हिरवा कंदील

Order for the action of Hupri Municipal Corporation | हुपरी पालिकेच्या कार्यवाहीचे आदेश

हुपरी पालिकेच्या कार्यवाहीचे आदेश

Next

हुपरी : कृती समितीचे आंदोलन, लोक चळवळी यामधूून मंजूर झालेल्या हुपरीत नगरपालिका स्थापण्यास अखेर ग्रामविकास मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे पुढील निवडणूक नगरपालिकेचीच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
मुंबईत आमदार सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाहासाहेब कांबळे, माजी सरपंच दौलतराव पाटील, भाजपचे सुदर्शन खाडे, अशोकराव खाडे, तानाजी घोरपडे, प्रवीण कुंभोजकर यांचा समावेश होता. उग्र ओदोलनामुळे ३० जुलैला झालेल्या कृती समितीच्या आंदोलनाला आमदार सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर यांच्या पुढाकराने अभूतपूर्व यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुपरी नगरपालिकेची घोषणा करीत
१ आॅगस्टला उद्घोषणाही केली. त्यानंतर गेले सात महिने कृती समिती याचा पाठपुरावा करीत आहे. ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद यांचा अहवाल तसेच विविध महत्त्वाची कागदपत्रे कृती समितीच्या माध्यमातून जमविली गेली. जिल्हा परिषदेने हा अहवाल ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठविला होता. सध्या सुरू असलेल्या अधिवेशन काळात यावर शिक्कामोर्तब होणे महत्त्वाचे होते. त्यामुळे कृती समितीने आमदार सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली व नगरपालिकेसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर मुंडे यांनी तत्काळ यावर कार्यवाही करण्याचे आदेश देऊन हुपरी गावाचा ग्रामीण विभागातून शहरी विभागात समावेश करण्याचा निर्णय तत्काळ घेतला. त्यामुळे हुपरी नगरपालिका मंजुरीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

लोकप्रतिनिधींमध्ये उत्साह
नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर लोकप्रतिनीधींची पदे जाणार अशी चर्चा होती. मात्र, तालुका पंचायत, जिल्हा परिषद गटात इंगळी, तळंदगे या गावांचा समावेश असल्याने जिल्हा परिषद सदस्य व समाजकल्याण सभापती किरण कांबळे, तालुका पंचायत सदस्य रावसाहेब पाटील व सुप्रिया सलगर यांची पदे अबाधित राहणार आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये उत्साह आहे.

लवकरच प्रशासक
दरम्यान, कृती समितीच्या माध्यमातून याबाबत जोरदार पाठपुरावा सुरू आहे.
त्यामुळे नगरविकास मंत्रालयात ग्रामविकास मंत्रालयातून प्रस्ताव गेल्यानंतर हुपरी ग्रामपंचायतीवर प्रशासक येण्याची शक्यता आहे.


देवदासींचा मागण्यांसाठी मोर्चा
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चाचा इशारा

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी देवदासींनी बुधवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्च काढून निदर्शने केली. या मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेवक अशोक भंडारे यांनी केले. मोर्चामध्ये देवदासी, जोगते, वाघ्या-मुरळी, कलावंत, वासुदेव, पोतराज, आदी कपाळाला भंडारा लावून सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर तेथे शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांना निवेदन देण्यात आले. प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास दि. २० एप्रिल रोजी पुन्हा भव्य मोर्चा व त्यानंतरही पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला.
देवदासी पुनर्वसनमधील काही योजनांत सुधारणा करून २०१३ राज्याचे महिला धोरण त्वरित मंजूर करावे, देवदासींचा दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश करून त्यांना पिवळे रेशनकार्ड देण्यात यावे. सध्या मिळणाऱ्या ६०० रुपये पेन्शनमध्ये वाढ करून ती दरमहा १५०० रुपये करावी, राज्य शासनाकडून देवदासींना ओळखपत्रे द्यावीत, कोल्हापुरात विविध ठिकाणी उपलब्ध असलेली शासनाची जागा जिल्ह्यातील देवदासींच्या गृहनिर्माण संस्थेला घरकुल बांधण्यासाठी शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, आदी मागण्यांसाठी देवदासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
मोर्चाला येथील दसरा चौकातून प्रारंभ झाला. मोर्चा व्हीनस चित्रमंदिर, बसंत-बहार चित्रमंदिरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर तेथे मुख्य प्रवेशद्वारासमोर अडविण्यात आला. मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत, दोन वर्षांपूर्वी बैठक घेऊन देवदासींना यूएलसीखाली जमीन देण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आश्वासन दिले होते; पण त्या संदर्भात दलित समाजातील देवदासींची फसवणूक झाल्याचे भंडारे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी बर्गे यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून आपल्या मागण्यांबाबत सत्वर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. प्रलंबित मागण्यांसंबंधी शासनाकडे शिफारस करीत असल्याचे सांगितले. पण, गेल्या २५ वर्षांत शासनाने आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप यावेळी अशोक भंडारे यांनी केला. शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनाची माहिती भंडारे यांनी आंदोलकांना दिली. यावेळी माजी नगरसेविका मायादेवी भंडारे यांनीही मार्गदर्शन केले.
मोर्चात देवताई साळोखे, रखमाबाई पाटील, जमन्नता वज्रमपट्टी, मालनताई आवळे, सखुबाई अवघडे, लीलाबाई काळे, शिवाजी शिंगे, पंकज भंडारे, राजू हरी ज्वाळे, शिवाजी नलवडे, सिकंदर बेपारी, कुणाल पाटील, विनायक लोखंडे, रोहित कट्टी, आशाताई गायकवाड, बेबीताई पाटील, सरस्वती काळे, रेखा वडर, बाळगुंड पाटील, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

आश्वासनपूर्ती करा अन्यथा पुन्हा मोर्चा
शासनाने आश्वासनपूर्ती न केल्यास येत्या २० एप्रिलला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्यातूनही देवदासींच्या मागण्या पूर्ण न करता फसवणूक केल्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी माजी नगरसेवक अशोक भंडारे यांनी दिला.

Web Title: Order for the action of Hupri Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.