मूळ कामावर हजर होण्याचे आदेश
By admin | Published: January 20, 2016 12:53 AM2016-01-20T00:53:01+5:302016-01-20T01:04:27+5:30
आयुक्तांनी दिला धक्का : शंभर झाडू, सफाई कामगारांच्या बदल्या
कोल्हापूर : मूळ नेमणूक ‘झाडू कामगार किंवा सफाई कामगार’ अशी आहे; परंतु प्रत्यक्ष काम मात्र कार्यालयात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली करतात. झाडू कामगार असूनही ‘साहेबा’च्या अविर्भावात काम करणाऱ्या १०० झाडू व सफाई कर्मचाऱ्यांना मंगळवारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बदल्या करून चांगलाच धक्का दिला. त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले
महानगरपालिकेतील आरोग्य विभागात ‘झाडू किंवा सफाई कामगार’ म्हणून नेमणूक झालेल्या अनेक कामगारांनी कर्मचारी संघटनेचे नेते, अधिकारी, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा वशिला लावून मूळ कामातून सुटका करून घेत पालिकेच्या विविध कार्यालयांत क्लार्क म्हणून काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या वशिलेबाज कामगारांनी ‘साहेबी’ थाटात काम केले; परंतु त्याचा प्रामाणिक कामगारांवर अन्याय होत राहिला. शिवाय सफाईच्या कामावरही त्याचा परिणाम झाला आहे. प्रभागात झाडू कामगार मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
या विषयावर महानगरपालिका सभागृहात नगरसेवक भूपाल शेटे यांनी आवाज उठविला होता. अनेक नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत ‘झाडू कामगार दाखवा, पेहरावा करू’ अशा शब्दांत टीका केली होती. त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर यांनी अशा कामगारांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार करण्यास कामगार विभागास सांगण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १०० कामगारांची माहिती गोळा करण्यात आली. सर्व कामगार असूनही कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत होते. या सर्व कामगारांच्या बदल्या केल्याचे आदेश आयुक्तांनी सोमवारी काढले आणि ते मंगळवारी बजावण्यात आले. आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करायची असून जे कर्मचारी मूळ कामावर हजर होणार नाहीत किंवा वशिला लावण्यासाठी राजकीय दबाव आणतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांच्या घरात कामगार
अनेक वरिष्ठांच्या घरात धुणे-भांडी करण्यासाठी तसेच स्वयंपाक करण्यासाठी महापालिकेतील कामगार काम करत आहेत. ते महापालिकेत कधीही फिरकत नाहीत. केवळ पगार घेण्यासाठी तसेच अन्य कामांसाठीच येतात. त्यामुळे या सर्व कामगारांनाही मूळ कामावर पाठवा, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली आहे.