मंत्री होण्यासाठी अगोदर निवडून यावे लागते
By Admin | Published: May 5, 2017 11:44 PM2017-05-05T23:44:41+5:302017-05-05T23:44:41+5:30
मुश्रीफ यांचा गर्भित इशारा : दादांचे वक्तव्य अनाकलनीय
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘खासदार धनंजय महाडिक हे केंद्रात मंत्री असतील,’ हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विधान अनाकलनीय आहेच; परंतु मंत्री होण्यासाठी अगोदर लोकसभा निवडणुकीत निवडून यावे लागते, असा गर्भित इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्र्यांसह महाडिक यांनाही दिला. निवडून न येताही मंत्री होता येते, पण त्यासाठी सत्ता हवी आणि थेट पंतप्रधानाच्या मनात आले तर हे शक्य असल्याची मिश्कील टिप्पणीही आमदार मुश्रीफ यांनी केली. दादा तसे काय करणार असतील तर ते मला काय माहित नाही, अशीही पुस्ती त्यांनी हसत हसत जोडली.
अंबाबाई सुवर्ण पालखी सोहळ्यात पालकमंत्री पाटील यांनी ‘सन २०१९ ला राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे केंद्रात मंत्री असतील,’ असे भाकीत केले. खासदार महाडिक यांची भाजपशी असलेली जवळीकता पाहता पालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्याला फार महत्त्व आहे. याबाबत आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांना
२०१९ मध्ये मंत्री करण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वक्तव्य अनाकलनीय आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देशात कॉँग्रेस, राष्ट्रवादी मित्रपक्षांचे सरकार येणार आणि त्यात महाडिक मंत्री असतील, असे ‘दादां’ना म्हणायचे नसेल ना? की महाडिक यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्री करणार, असे दादांच्या वक्तव्याचे दोन अर्थ निघू शकतात. घटनेनुसार मंत्री होण्यासाठी निवडून येणे गरजेचेही नाही. मंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे असते.’
महाडिक यांचे मौन
पालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्यावर खासदार महाडिक काहीच बोललेले नाहीत. वास्तविक त्यांनी यावर बोलून त्यांच्याविषयी निर्माण झालेले संशयाचे वातावरण स्वच्छ करणे गरजेचे होते.