शिपाईपदाच्या कंत्राटीकरणाचा आदेश तत्काळ रद्द करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:38 AM2020-12-16T04:38:33+5:302020-12-16T04:38:33+5:30
कोल्हापूर : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंधाबाबत दि. ११ डिसेंबरला काढलेल्या आदेशात शिपाईपदाचे कंत्राटीकरण करण्यात ...
कोल्हापूर : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंधाबाबत दि. ११ डिसेंबरला काढलेल्या आदेशात शिपाईपदाचे कंत्राटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांच्या अडचणीत भर पडणार असल्याने हा आदेश तत्काळ रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सभेत मंगळवारी करण्यात आली. मुख्याध्यापक संघाच्या नूतन कार्यकारी मंडळाची पहिली सभा शिवाजी पार्क येथील विद्याभवनमध्ये झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ होते. शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंधाबाबतच्या आदेशाविरोधात शुक्रवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असून, त्यामध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या सभेमध्ये करण्यात आले.
सचिव दत्ता पाटील, जीवनराव साळोखे, जे. बी. पाटील, पी. जी. पोवार, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष बी. आर. बुगडे, सहसचिव अजित रणदिवे, खजानिस नंदकुमार गाडेकर, संचालक अनिता नवाळे, सारिका यादव, बबन इंदुलकर, आदी उपस्थित होते. रवींद्र मोरे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मानले.
चौकट
अन्सारी, हुबळे यांची निवड
या सभेत इरफान अन्सारी यांची लोकल ऑडिटर, तर अशोक हुबळे यांची संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली. संघाचे नूतन पदाधिकारी, संचालकांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड आणि राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, एम. के. आळवेकर, आदींच्या हस्ते करण्यात आला.
फोटो (१५१२२०२०-कोल-मुख्याध्यापक संघ) : कोल्हापुरात मंगळवारी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या पहिल्या सभेत अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून बी. आर. बुगडे, मिलिंद पांगिरेकर, दत्ता पाटील, इरफान अन्सारी, अजित रणदिवे उपस्थित होते.