बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: January 2, 2015 10:39 PM2015-01-02T22:39:11+5:302015-01-03T00:02:48+5:30
दीपक पवार यांची माहिती : कोट्यवधीची माया गोळा केल्याचा आरोप
सातारा : नव्याने बांधण्यात आलेल्या अभयसिंहराजे भोसले संकुलातील २५ गाळे वाटपांमध्ये लाचखोर सचिव मनवे आणि एका पदाधिकाऱ्याने कोट्यवधींची माया गोळा करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता. त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पणन आयुक्त दिनेश ओळकर यांना दिले असल्याची माहिती भाजपाचे दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवार म्हणाले, भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्यांमध्ये पोटभाडेकरू ठेवून दारू, गुटखा असे व्यवसाय सुरू आहे . बाजार समितीने ज्या मालकांना भाडेतत्त्वावर गाळे दिले आहेत, त्यांनी हेच गाळे पोटभाडेकरूंना भाड्याने देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये भाडे वसूल करत आहेत. मूळ गाळेधारक पदाधिकाऱ्यांना हप्ते देऊन बाजार समितीचे नुकसान करत आहेत,’ असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.
संकुलाच्या इमारतीसाठी पणन खात्याने एक कोटी चाळीस लाख अनुदान दिले होते. तो खर्च एक कोटी ९४ लाखांपर्यंत कसा गेला, असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एका गाळ्यामध्ये गुटखा, तंबाखू असे पदार्थ मिळूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही. हे प्रकरण दडपण्यासाठी एका नेत्याला दोन किलो चांदीची तलवार भेट दिली आणि लाचखोर सचिव मनवे यांना खूश केले, असाही दीपक पवार यांनी आरोप केला. (प्रतिनिधी)
उदयनराजेंच्या भूमिकेचे स्वागत
शेती उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करून भ्रष्ट संचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. उदयनराजे यांनी बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधी आवाज उठविल्यास कोट्यवधींचा भ्रष्टाचार बाहेर पडून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही दीपक पवार यांनी यावेळी सांगितले.