जिल्हा बॅँकेला अपात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:13 AM2019-06-04T10:13:15+5:302019-06-04T10:16:12+5:30
अपात्र कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन कागल येथील हमीदवाडा साखर कारखान्याचे माजी संचालक बाबगोंड पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी विभागीय उपनिबंधक प्रदीप बरगे यांना दिले. शेतकऱ्यांना तत्काळ न्याय न दिल्यास जनआंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोल्हापूर : अपात्र कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन कागल येथील हमीदवाडा साखर कारखान्याचे माजी संचालक बाबगोंड पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी विभागीय उपनिबंधक प्रदीप बरगे यांना दिले. शेतकऱ्यांना तत्काळ न्याय न दिल्यास जनआंदोलन उभारू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनाची प्रत न्यू शाहूपुरी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक कृष्णा ठाकरे यांनाही देण्यात आली. सन २००७ व २००८ साली केंद्र सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले आहे. देशभरातील सर्व शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळाला; परंतु जिल्ह्यातील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे हे सर्व शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले आहेत.
यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दावे दाखल केले. या दाव्यांपैकी फेरयाचिकेची सुनावणी होऊन न्यायालयाने दाव्यातील सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवीत त्यांचा कर्जपुरवठा सुरू करावा, असा महत्त्वपूर्ण निकाल ३० जानेवारी २०१७ ला दिला. या आदेशाविरुद्ध ‘नाबार्ड’ने सर्वाेच्च न्यायालयात दावा दाखल केला.
याची सुनावणी २८आॅगस्ट २०१७ रोजी होऊन मूळ दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत ज्या अपात्र शेतकऱ्यांची थकीत रक्कम १० लाख रुपये इतकी आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा करावा, असा अंतरिम आदेश दिला आहे.
हा आदेश होऊन आठ महिने झाले तरी जिल्हा बॅँकेने सदर शेतकऱ्यांना अजूनही कर्जपुरवठा सुरू केलेला नाही. जिल्हा बॅँक प्रशासनाला निवेदन देऊनही यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी बॅँकेला कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत; अन्यथा सनदशीर मार्गाने जनआंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.
शिष्टमंडळात यशवंत संकपाळ, लक्ष्मण व्हन्नुरे, कुतबुद्दीन नदाफ यांच्यासह शेतकºयांचा समावेश होता.
नाव ‘नाबार्ड’चं अन् स्वार्थ निवडणुकीचा
नाबार्ड पतपुरवठा करू देत नाही असे म्हणणे चुकीचे आहे, असे कारण सांगणाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा पतपुरवठा करून निवडणुकीचा स्वार्थ साधायचा आहे, असा टोला जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता बाबगोंड पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.