‘महाद्वार’ फेरीवाला क्षेत्र करण्यास मनाई आदेश

By admin | Published: March 2, 2016 12:05 AM2016-03-02T00:05:13+5:302016-03-02T00:44:38+5:30

दिवाणी न्यायालय : पुढील सुनावणी १७ मार्चला

Order forbidden to do 'Mahadwar' hawker area | ‘महाद्वार’ फेरीवाला क्षेत्र करण्यास मनाई आदेश

‘महाद्वार’ फेरीवाला क्षेत्र करण्यास मनाई आदेश

Next

कोल्हापूर : फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाची पर्यायी जागा म्हणून महाद्वार रोड व ताराबाई रोड येथे फेरीवाला क्षेत्र करण्यास येथील दहावे कनिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती के. एम. चव्हाण यांनी मंगळवारी तुर्तातूर्त मनाई केली. याची पुढील सुनावणी १७ मार्चला होणार असून महानगरपालिकेस म्हणणे मांडण्याबाबत बजावण्यात आले आहे.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबविण्यासाठी शहरात विविध ठिकाणी ‘फेरीवाला क्षेत्र’ व ‘ना फेरीवाला क्षेत्र’ जाहीर केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत मोठी वर्दळ असलेल्या ताराबाई रोड व महाद्वार रोड ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर केले परंतु फेरीवाला कृती समितीच्या आक्षेपानंतर महाद्वार रोडवर महानगरपालिका प्रशासनाकडून सारडा दुकान ते पापाची तिकटी आणि ताराबाई रोडवर कपिलतीर्थ मार्के ट ते रंकाळा चौपाटी या मार्गावर ‘फेरीवाला क्षेत्र’ करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी या रस्त्यावर फेरीवाल्यांना पट्टे मारून देण्यात येत होते. त्यामुळे व्यापारीवर्गात असंतोष पसरला होता. आंदोलन करून पट्टे मारून देण्याचे काम बंद पाडले होते.
याबाबत व्यापारी व उद्योजक महासंघाच्यावतीने १६ व्यापाऱ्यांनी येथील दहावे कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती के. एम. चव्हाण यांच्या न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. व्यापाऱ्यांच्यावतीने अ‍ॅड. अरविंद मेहता यांनी बाजू मांडली. महाद्वार रोड व ताराबाई रोड वर्दळीचे प्रमुख रस्ते असून या परिसरात शाळा, यात्री निवास, मंदिरे, व्यावसायिक दुकाने मोठ्या संख्येने असल्याने या ठिकाणी पुन्हा फेरीवाला क्षेत्र चुकीचे करणे उचित ठरणार नाही, त्यामुळे त्यास मनाई केली जावी, अशी विनंती अ‍ॅड. मेहता यांनी न्यायालयास केली होती. ती न्यायालयाने मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत महापालिकेच्या फेरीवाला क्षेत्र करण्याच्या प्रयत्नांना मनाई केली. महानगरपालिकेचे अधिकारी त्यांचे म्हणणे जोपर्यंत न्यायालयात मांडत नाहीत, तोपर्यंत ही मनाई राहणार आहे. यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, किरण नकाते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘ ना फेरीवाला क्षेत्र’ बदलण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे
सांगली- मिरज येथून येणाऱ्या विक्रेत्यांना मज्जाव करण्यात यावा
विक्रेत्यांची बायोमेट्रीक कार्डची तपासणी करावी अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी केली.

Web Title: Order forbidden to do 'Mahadwar' hawker area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.