ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला बसणार चाप, विभागीय आयुक्तांचे आदेश : ग्रामपंचायतीत उपस्थिती बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:11 AM2018-02-16T01:11:04+5:302018-02-16T01:11:39+5:30
कोल्हापूर : ऊठसूट बैठका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला चाप लावण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला असून, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत त्यांना ग्रामपंचायतीमध्ये थांबणे
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : ऊठसूट बैठका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ग्रामसेवकांच्या ‘फिरती’ला चाप लावण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी घेतला असून, सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत त्यांना ग्रामपंचायतीमध्ये थांबणे बंधनकारक केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्हा परिषदांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पुण्यात झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ग्रामसेवकांच्या उपस्थितीबाबत गांभीर्याने चर्चा झाली होती. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक अधिकाधिक वेळ ग्रामपंचायतीमध्ये असणे आवश्यक असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला होता. याला अनुसरून विभागीय आयुक्तांनी सविस्तर आदेश दिले असून, आता केवळ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारीच ग्रामसेवकांना पंचायत समितीमध्ये बैठकीसाठी यावे लागणार आहे.
एका ग्रामसेवकाकडे शक्यतो एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कारभार देऊ नये, रजेवर गेलेल्या ग्रामसेवकाचा कार्यभार लगतच्या ग्रामसेवकाकडे द्यावा, केवळ पहिल्या, तिसºया सोमवारी तालुक्याला आढावा बैठक घ्यावी, त्याची विषयसूची तयार करून आधीच पाठवावी, सकाळी १० वाजता ही बैठक सुरू करावी, याच दिवशी ग्रामसेवकांनी विभागप्रमुखांच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी भेटी घ्याव्यात. या आढावा सभेला हजर राहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यासाठी एक पालक अधिकारी नेमावा, असे या आदेशात म्हटले आहे.अपवादात्मक परिस्थितीत विस्तार अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडावे, प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर ग्रामसेवकाच्या कामाचा दिवस व पंचायत समिती भेटीचा दिवस फलकावर लिहावा.
वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी निर्णय
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गावोगावी दौरे करताना ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक फार वेळ उपस्थित नसतात, अशा ग्रामस्थांच्या तक्रारी येत होत्या. ग्रामसेवकांशी बोललो तर ते म्हणतात, एवढ्या योजना आहेत की, त्या कामांसाठी आणि आढावा बैठकांसाठी आम्ही पंचायत समितीमध्ये जास्त वेळ असतो. प्रत्येक खात्याचा अधिकारी स्वतंत्रपणे ग्रामसेवकाला बोलावत असल्याने त्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. म्हणूनच याबाबत साकल्याने विचार करून विकासकामे वेळेत व्हावीत आणि ग्रामसेवकांचीही अनावश्यक धावपळ वाचावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीचे वेळापत्रकही निश्चित
महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी होणाºया पंचायत समितीमधील बैठकीचे वेळापत्रकही विभागीय आयुक्त कार्यालयाने तयार करून दिले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कोणत्या विभागांचा आढावा घ्यायचा आणि त्यामध्ये अधिकाºयांनी नेमके काय योगदान द्यायचे याची सविस्तर माहिती या परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पाच जिल्ह्यांत ३५०० ग्रामसेवक
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत ६५०० गावे असून ५५०० ग्रामपंचायती आहेत; तर ३५०० ग्रामसेवक कार्यरत आहेत. २००० ग्रामसेवकांच्या जागा रिक्त असल्याने एका ग्रामसेवकाकडे तीन-चार ग्रामपंचायतीही देण्यात आल्या आहेत. त्याचा पुनर्विचार आता करण्यात येणार आहे.
शेतकरी, ग्रामस्थांची सोय महत्त्वाची
ग्रामीण भागामध्ये सकाळी लवकर शेतकरी, ग्रामस्थ आपल्या कामासाठी निघून जातात. नंतर ग्रामसेवक येतात. त्यामुळे कामात दिरंगाई होते; म्हणूनच यापुढे ग्रामसेवकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.