बाजार समितीच्या ३७ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 03:29 PM2019-10-12T15:29:28+5:302019-10-12T15:31:16+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कमी केलेल्या ३७ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. २०१४ ला समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कमी होते. तब्बल पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने कमी केलेल्या ३७ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. २०१४ ला समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कमी होते. तब्बल पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने जंबो नोकरभरती केली होती. संचालकांसह नेत्यांनीही भरतीत सहभाग घेतल्याने तब्बल ४१ कर्मचाऱ्यांना कामावर घेतले होते; पण याविरोधात संचालक नंदकुमार वळंजू, बाजार समिती व संजय बाबगोंडा पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
न्यायालयाने संबंधितांना कामावर घेण्याचे आदेश दिले होते, त्यास समितीचे प्रशासक महेश कदम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. येथे समितीने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत नोंदविल्याने नव्याने आलेले प्रशासक रंजन लाखे यांनी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश दिले.
या आदेशाविरोधात कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात पुन्हा धाव घेतली. त्यावर गेली तीन-चार वर्षे सुनावणी प्रक्रिया होऊन न्यायालयाने लाखे यांनी दिलेले आदेश रद्द ठरवित ३७ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत.
तब्बल पाच वर्षांनी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार शुक्रवारी काही कर्मचाऱ्यांनी हजर करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते. कर्मचाऱ्यांकडून अॅड. बी. बी. पोवार, समितीकडून अॅड. आर. एल. चव्हाण, तर वळंजू यांच्याकडून अॅड. ए. टी. उपाध्ये यांनी काम पाहिले.