शस्त्रक्रियेसाठी रुग्णांनीच ब्लेड आणल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:59 AM2019-07-11T11:59:50+5:302019-07-11T12:01:43+5:30
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) बुधवारी मोतीबिंदू शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या; पण या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून ब्लेड खरेदी करून आणण्यास भाग पाडणे तसेच सीपीआर आवारातील खासगी औषध दुकानातून ‘एमआरपी’ नसणारी ब्लेड जादा किमतीला विक्री झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) बुधवारी मोतीबिंदू शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या; पण या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून ब्लेड खरेदी करून आणण्यास भाग पाडणे तसेच सीपीआर आवारातील खासगी औषध दुकानातून ‘एमआरपी’ नसणारी ब्लेड जादा किमतीला विक्री झाल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
याबाबत मंगळवारी सायंकाळी एका रुग्णाच्या नातेवाइकाने ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार केली होती; त्याबाबत बुधवारीच वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचे पडसाद वृत्त प्रसिद्ध होताच उमटले.
येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) बुधवारी सुमारे १५ जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याबाबत अधिष्ठाता डॉ. लोकरे यांनी, या शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीत केल्या जातात. या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सर्व उपकरणे रुग्णालयानेच उपलब्ध करून द्यावी लागतात. त्यासाठी शासकीय निधी मिळतो; पण बुधवारी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही.
यापुढे मोतीबिंदू शस्त्रक्रिया ठरलेल्या वेळेतच होणार, त्यासाठी उपकरणे खरेदीसाठी शासकीय निधी वेळेत आला नाही तर ‘सीपीआर’च्या निधीतून त्याची खरेदी व्हावी, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारे ब्लेड रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून आणण्यास भाग पाडणाऱ्या डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
औषध दुकानदाराचीही चौकशी
सीपीआर आवारात असणाऱ्या खासगी औषध दुकानातून ही तीन ब्लेड एकूण १८० रुपयांत उपलब्ध होतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते. प्रत्यक्षात या औषध दुकानातून रुग्णाच्या नातेवाइकांना ही ब्लेड ३०० रुपये दराने खरेदी करावी लागली. तसेच या ब्लेडच्या पाकिटावर कोणतीही ‘एमआरपी’ (किंमत) छापलेली नाही; तसेच खरेदीची पावतीही दिली नाही. अशा पद्धतीने औषधांची विक्री करता येणार नाही; त्यामुळे या औषध दुकानातील औषधांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. लोकरे यांनी सांगितले.