संजय कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: June 5, 2015 01:03 AM2015-06-05T01:03:25+5:302015-06-05T01:03:36+5:30
व्यापाऱ्यांना वेठीस धरले : बाजार समितीच्या कनिष्ठ अभियंतापदाचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारी
कोल्हापूर : पदाचा दुरुपयोग करून आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या फर्मच्या माध्यमातून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील बांधकामे करून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या व व्यापाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कनिष्ठ अभियंता संजय बळवंत कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी बुधवारी (दि. ३) दिले. कागलच्या सहायक निबंधक (सहकारी संस्था) अरुणा पाटील यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. चोकाक (ता. हातकणंगले) येथील मानसिंग बाबूराव ढेरे यांच्या तक्रारीवरून ही चौकशी होत आहे.
संजय कुलकर्णी हे बाजार समितीमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावावर सुशांत एंटरप्रायजेस ही बांधकाम व्यावसायिक फर्म सुरू केली आहे. आपल्या पदाचा गैरवापर करीत बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना वेठीस धरून सर्व बांधकामे आपल्या फर्मला घेतली आहेत. त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपये उकळले आहेत. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून केली जाणारी बांधकामे आपल्या फर्मच्या माध्यमातूनच करावीत, अशी सक्ती त्यांच्याकडून केली जात होती. त्यांना काम मिळाले तरच बांधकाम परवानगीची फाईल तातडीने मंजूर व्हायची अन्यथा अनेक महिने व्यापाऱ्यांना ताटकळावे लागायचे, असे ढेरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या संदर्भात २०१४ मध्ये तत्कालीन प्रशासक महेश कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती; परंतु त्यानंतरच्या प्रशासकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या संदर्भात मानसिंग ढेरे यांनी कार्यकारी संचालक, कृषी-पणन मंडळ, राज्य पणन संचालक (पुणे), जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), विभागीय सहनिबंधक, बाजार समिती प्रशासक यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यांची दखल घेत कार्यकारी संचालक, कृषी-पणन मंडळ, राज्य पणन संचालक (पुणे)यांच्या आदेशाद्वारे जिल्हा उपनिबंधकांनी संजय कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संजय कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. त्यांची चौकशी व्हावी यासाठी आपण अनेक तक्रारी देऊन पाठपुरावा केला आहे. त्यानुसार त्यांची चौकशी सुरू झाली आहे. चौकशी अधिकाऱ्यांकडून चांगल्या पद्धतीने काम होईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आपल्यासमोर न्यायालयात जाण्याचाही पर्याय आहे.
- मानसिंग ढेरे, तक्रारदार