चाईल्डलाईनकडील गंभीर प्रकरणांच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 03:47 PM2020-08-27T15:47:22+5:302020-08-27T15:52:22+5:30
पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बालविवाह, नागाळा पार्कातील बलात्कार आणि करवीर तालुक्यातील पोक्सोन्वये कारवाई प्रकरणांत चाईल्डलाईन संस्थेने आर्थिक व्यवहार करून या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीची तातडीने चौकशी करावी, असे आदेश राज्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. हृषिकेश यशोद यांनी दिले.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बालविवाह, नागाळा पार्कातील बलात्कार आणि करवीर तालुक्यातील पोक्सोन्वये कारवाई प्रकरणांत चाईल्डलाईन संस्थेने आर्थिक व्यवहार करून या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीची तातडीने चौकशी करावी, असे आदेश राज्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. हृषिकेश यशोद यांनी दिले.
कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना त्यासंबंधीचे पत्र त्यांनी दिले असल्याने ही चौकशी आता पोलीस खात्यातर्फेच होणार आहे.लोकमतने या संदर्भातील वृत्त ८ ऑगस्टला दिले होते.
या गैरप्रकाराबद्दल संस्थेतील माजी कर्मचाऱ्यांनी निनावी तक्रार केली आहे. त्याचा आधार घेऊन अन्य एका संस्थेने तीन महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी लेखी मागणी ५ ऑगस्टला चाईल्डलाईन इंडिया फौंडेशनसह महिला व बालविकास आयुक्त, जिल्हाधिकारी व बालकल्याण समितीकडे केली होती. चाईल्डलाईन संस्थेचे कोल्हापूर केंद्र सांगली मिशन सोसायटीतर्फे चालविले जाते.
पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील मुलीचा मेमध्ये बालविवाह करण्यात येणार असल्याचे चाईल्डलाईनला समजले. या प्रकरणात कर्मचाऱ्याने ५० हजार रुपये व बांधकामासाठी एक वाळूचा ट्रक घेतला. या मुलीचे लग्न झाले असून सध्या ती पाच महिन्यांची गरोदर आहे.
कोल्हापुरातील आर.के.नगरजवळ असलेल्या गावातील बाललैंगिक अपराध नोंद (पोक्सो) प्रकरणात एका मॅडममार्फत आर्थिक व्यवहार झाला आहे. भीक मागणाऱ्या मुलांना पकडले जाते. तुमची केस बालकल्याण समितीसमोर नेत नाही, असे लिहून घेऊन भीक मागितलेले पैसेही कर्मचारी काढून घेतात, असे तक्रारींचे स्वरूप आहे.
चाईल्डलाईन कोल्हापूर संस्थेकडून बालकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे. बालविवाहास प्रोत्साहन दिले जात आहे. बाललैंगिक अपराध प्रकरणे उघडकीस येऊ नयेत, यासाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे तक्रारीवरून दिसते. हे आक्षेप गंभीर व अपराधिक स्वरूपाचे असल्याने त्याची तातडीने चौकशी करावी.
- डॉ. हृषिकेश यशोद
आयुक्त,
महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य
चक्क सरकारी रुग्णालयातच गर्भपात
नागाळा पार्कमधील १४ वर्षांच्या मुलीवर शेजारच्या डॉक्टरने अतिप्रसंग केला. हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी संबंधित डॉक्टरकडून दोन लाख रुपये घेण्यात आले. गर्भवती मुलीचा लाईन बझारमधील सर्वोपचार केंद्रात शस्त्रक्रिया करून गर्भ काढून टाकण्यात आल्याची तक्रार आहे.
हे रुग्णालय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे आहे. त्यामुळे तिथे असा प्रकार घडला असेल तर ते अधिकच गंभीर आहे. तक्रार होऊनही रुग्णालयाच्या प्रशासनाकडून याबाबत काहीच स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.
प्रकरण धसास लागणार
ज्या प्रकरणाची महिला व बालविकास आयुक्तांनी दखल घेतली, त्या प्रकरणात जिल्हा बालकल्याण समितीने आतापर्यंत फक्त संबंधित संस्थेला नोटीस बजावली आहे. आता ही चौकशी पोलिसांमार्फत होणार असल्याने त्यातील नेमके तथ्य बाहेर येण्यास मदत होऊ शकेल.