पर्यायी पूल १५ दिवसांत मागी

By Admin | Published: August 5, 2016 01:09 AM2016-08-05T01:09:42+5:302016-08-05T02:00:55+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : शिवाजी पुलाबाबत सर्वपक्षीय कृती समिती आक्रमर्क

Order for optional pool 15 days | पर्यायी पूल १५ दिवसांत मागी

पर्यायी पूल १५ दिवसांत मागी

googlenewsNext

कोल्हापूर : महाड येथील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापुरातीलही ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. ‘हेरिटेज’च्या नावाखाली पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबविल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने केला. या पर्यायी पुलाच्या कामांबाबत संपूर्ण माहिती घेऊन काम पुढे सुरू होण्याबाबत येत्या १५ दिवसांत मार्ग काढू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शिष्टमंडळास दिले.
कोल्हापुरातून रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवाजी पूल कालबाह्य झाल्याने त्याशेजारी अर्धवट अवस्थेत असलेल्या पर्यायी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत महापौर अश्विनी रामाणे व माजी महापौर आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
गेली वर्षभर आंदोलने करून पर्यायी शिवाजी पुलाच्या अपुऱ्या बांधकामांबाबत मार्ग निघाला नाही. जुन्या पुलाची कालमर्यादा संपल्याने महाडसारखी दुर्घटना घडण्यास वेळ लागणार नाही. हेरिटेजच्या नावाखाली पुरातत्त्व विभागाने पुलाचे काम थांबविले आहे. त्यामुळे दुर्घटनेत माणसे मेल्यानंतर पुलाचे काम सुरू होणार का? असा प्रश्न करीत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आर. के. पोवार यांनी दिला. यावेळी सर्वपक्षीय आणि महापालिका यांच्यावतीने स्वतंत्रपणे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना दिले.
महापौर रामाणे म्हणाल्या, पर्यायी पुलाबाबत महापालिकेने कागदोपत्री सर्व परवाने दिले आहेत; पण पुरातत्त्व विभागाने काम थांबविले. जुन्या पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे; त्यामुळे पर्यायी पुलाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे, अशी त्यांनी मागणी केली.
‘हेरिटेज’चा बाऊ करू नये. पूल हा रस्त्याला समांतर आहे; त्यामुळे हेरिटेजचा काहीही संबंध नसल्याचे भाजप गटनेते विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनीही, प्रसंगी पुलाबाबत कायदा बदलून, पाठपुरावा करून पर्यायी पुलाचे काम पूर्ण करावे असे सुचविले. शिवाजी पुलाच्या खांबांचे काही दगड निसटल्याने तो धोकादायक स्थितीत असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी निदर्शनास आणले.
पर्यायी पुलाचे काम थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांसह आमच्यातील काही सहकारीही जबाबदार आहेत. त्यांनीच प्रशासनाला निवेदन देऊन काम थांबविले. प्रथम त्यांचा समाचार घ्यावा, असे बाबा पार्टे म्हणाले.
जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली. जुन्या शिवाजी पुलाची तपासणी केली असता प्राथमिक स्थितीत तो भक्कम आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुन्हा एकदा पुलाची तपासणी करू. पर्यायी पुलाच्या अपुऱ्या कामांबाबत कागदपत्रे तपासून येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होण्याबाबत सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन दिले.
यावेळी स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, सभागृहाचे नेते प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, नामदेवराव गावडे, संपत पाटील, किशोर घाटगे, भाजपचे माजी अध्यक्ष महेश जाधव, सतीशचंद्र कांबळे, सुभाष जाधव यांनीही आपल्या भूमिका मांडल्या. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, परिवहन समितीचे सभापती लाला भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम, नगरसेवक राजसिंह शेळके, शोभा कवाळे, दीपा मगदूम, माजी नगरसेवक विक्रम जरग, अशोक पोवार, बी. एल. बर्गे, वसंतराव मुळीक, निरंजन कदम, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


‘हेरिटेज’ पुलासाठी, मग ब्रह्मपुरीसाठी का नाही?
पर्यायी पुलाच्या कामात ब्रह्मपुरी टेकडीच्या हेरिटेजचा मुद्दा पुढे करून काम थांबविले असेल तर त्याच ब्रह्मपुरी टेकडीवर बांधकामे होताना अधिकारी झोपले होते का? ती बांधकामे त्यांना दिसत नाहीत का? हेरिटेजच्या नावाखाली हे विकासात्मक काम थांबविण्याचा डाव आहे. लोकभावना लक्षात घेऊन पर्यायी पुलाचे थांबविलेले काम पूर्ववत सुरू करावे, अशीही मागणी यावेळी केली.
सर्वपक्षीय बैठकीत निषेध
सकाळी महाराणा प्रताप चौकात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. पर्यायी पुलाविरोधातील काहींनी अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला.

Web Title: Order for optional pool 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.