तीन महिन्यांत वीज कनेक्शन देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:00+5:302021-01-01T04:18:00+5:30
कोल्हापूर : अनामत रक्कम भरूनही वीज कनेक्शनसाठी अडीच वर्षांहून अधिक काळ टाळाटाळ करणाऱ्या ‘महावितरण’ला, तीन महिन्यांच्या आत वीज कनेक्शन ...
कोल्हापूर : अनामत रक्कम भरूनही वीज कनेक्शनसाठी अडीच वर्षांहून अधिक काळ टाळाटाळ करणाऱ्या ‘महावितरण’ला, तीन महिन्यांच्या आत वीज कनेक्शन द्यावे आणि नुकसानभरपाई म्हणून ५१४८ रुपये भरावेत, असा निकाल ग्राहक मंचने दिला आहे. कागलचे अनिल जाधव यांनी ही तक्रार केली होती. तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा पुष्पा तावडे व सचिव सुधाकर जाधव व ग्राहक सदस्य प्रशांत यांनी हा निकाल दिला आहे.
जाधव यांनी २५ मे २०१८ रोजी ५ एचपीच्या वीज कनेक्शनसाठी ‘महावितरण’कडे अर्ज केला होता. अडीच हजार इतकी अनामत रक्कमही भरली होती. तथापि कनेक्शन मिळाले नाही, म्हणून विचारणा केल्यावर ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांकडून निधी नसल्याने कनेक्शन देता येत नाही, तातडीने कनेक्शन हवे असल्यास ४ लाखांचा खर्च स्वत: करावा, नंतर वीजबिलातून ते कपात केले जाईल. हे शक्य नसल्याने सौरपंपाचा पर्याय घ्यावा, हे देखील शक्य नसल्यास ज्येष्ठतेनुसार येणाऱ्या यादीची प्रतीक्षा करावी, असे सांगण्यात आले. याला वैतागलेल्या जाधव यांनी थेट ग्राहक मंचकडे केस दाखल करत साडेतीन लाखांची भरपाईची मागणी केली होती. पण ग्राहक मंचने जोडणीसाठी भरलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम नुकसानभरपाई म्हणून द्यावी व कनेक्शन तीन महिन्यांत द्यावे, असे आदेश दिले.