खासगी सावकारांच्या घरांवर छापे टाकण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:45 AM2019-05-08T11:45:57+5:302019-05-08T11:48:57+5:30
टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या परिक्षेत्रातील संशयित खासगी सावकारांच्या घरांवर छापे टाकण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. बहुतांश सावकारांविरोधात तक्रारी दाखल आहेत. त्यांची विशेष पथकांकडून चौकशी सुरू आहे.
कोल्हापूर : टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या परिक्षेत्रातील संशयित खासगी सावकारांच्या घरांवर छापे टाकण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. बहुतांश सावकारांविरोधात तक्रारी दाखल आहेत. त्यांची विशेष पथकांकडून चौकशी सुरू आहे.
संशयित सावकारांवर संघटित गुन्हेगारी ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ पेक्षा जास्त सावकारांवर पोलिसांची नजर असून, लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंगळवारी दिली.
अवैध व्यावसायिकांसह संघटित गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ३० पेक्षा जास्त टोळ्यांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापुढे अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांचा सुपडासाफ करण्याचे धोरण पोलीस प्रशासनाने अवलंबिले आहे.
शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळांत बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. जिल्ह्यात सावकारांकडून ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे, त्यांच्याकडे सावकार वसुलीसाठी तगादा किंवा दमदाटी करीत असतील तर नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा.
सावकारांच्या धमकीला बळी पडू नये. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील संशयित सावकारांविरोधात तक्रारी दाखल आहेत. त्यांची चौकशी सुरू असून घरांवर छापे टाकण्याचे आदेश दिले आहेत. करोडो रुपयांची माया मिळविणाऱ्या खासगी सावकारांवर ‘मोक्का’अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
गुन्हेगारी टोळ्या मोडीत काढा
पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, टोळ्यांवर कठोर कारवाई करा. दहशत करून कुळे काढणाऱ्या गुन्हेगारांचा बीमोड करा, असे आदेशही पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती डॉ. वारके यांनी दिली.