‘अंबाबाई’ आराखडा अध्यादेश प्राप्त
By admin | Published: June 24, 2017 05:37 PM2017-06-24T17:37:20+5:302017-06-24T17:37:20+5:30
मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : संपूर्ण देशभरात ख्याती असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या विकास आराखड्यातील सर्व शुक्लकाष्ठ आता दूर झाले असून, एक औपचारिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण झाल्यानंतर ६८ कोटी ७० लाख रुपयांच्या या आराखड्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात होईल.
दोन दिवसापूर्वीच राज्य सरकारकडून त्याबाबतचा अध्यादेश निघाला असून त्याची प्रत महानगरपालिका प्रशासनास प्राप्त झाली. पुढील दोन वर्षात ही कामे पूर्ण करायची आहेत. गेली अनेक वर्षे राज्यकर्त्यांची आश्वासने, अधिकाऱ्यांच्या तांत्रिक त्रुटी आणि समाजातून येणाऱ्या सुचना याच्या अनिष्ठ फेऱ्यात अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा अडकला होता.
कॉँग्रेस - राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकारच्या काळात १० कोटींचा निधी मंजूर होऊनही तो खर्च झाला नाही. कामेच न झाल्याने तो परत गेला होता. त्यानंतर अनेक अडथळ्याची शर्यत पार करीत , अनेक टप्पे ओलांडत या आराखड्यास उच्चाधिकार समितीची अंतिम मंजूरी मिळाली. बदललेली नियोजन आणि कामांनुसार हा आराखडा ६८ कोटी ७० लाख रुपये खर्चाचा आहे.
मुंबईत मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या उपस्थितीत दि. ९ जून रोजी झालेल्या बैठकीत आराखड्यास मंजूर दिली गेली. त्यासंदर्भातील इतिवृत्त आणि मंजूरीचा सरकारी अध्यादेश दोन दिवसापूर्वी महानगरपालिका प्रशानास प्राप्त झाला. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समिती समोर या आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे. अंतिम सादरीकरण ही केवळ औपचारिकता आहे.
मलिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने आराड्यास अंतिम मंजूरी दिल्यामुळे सर्व अडथळे दूर झाले आहेत. ६८.७० कोटी रुपयांचा हा आराखडा पहिल्या टप्प्यातील कामांसाठी तयार केला गेला आहे. पुढील दोन वर्षात पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामे के ली जाणार आहेत. अंतिम मंजूरी मिळाल्यामुळे तसेच त्याचा सरकारी अध्यादेश निघाल्यामुळे आता मंदिर परिसर विकास कामांना गती मिळणार आहे.
आराखड्याचा प्रवास असा..
सन २००८ : १२० कोटींचा आराखडा
सन २०१२ : १९० कोटींचा आराखडा
सन २०१३ : आराखड्याचे टप्पे करून ५० कोटींचा स्वतंत्र प्रस्ताव
सन २०१४ : मंदिर विकासाशी निगडित शहरांतर्गत बाबींचा समावेश करून २५५ कोटी
सन २०१५ : पहिल्या टप्प्यासाठी ७२ कोटींचा आराखडा
जून २०१६ : आराखडा जनतेसमोर सादर
जुलै २०१६ : पर्यटन समितीच्या बैठकीत मंजुरी
सप्टेंबर २०१६- इतर बाबींचा समावेश करून ९२ कोटींचा सुधारित आराखडा विभागीय आयुक्तांना सादर
आॅक्टोबर २०१६ : मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्यासमोर सादरीकरण
सप्टेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ : विभागीय आयुक्तांकडून बाबनिहाय शंकांवर महापालिकेकडून छाननी , इंजिनिअरिंग विभागाकडून स्ट्रक्चर आॅडिट (रक्कम ९२ कोटींवरुन ६८.७० कोटी)
फेब्रुवारी २०१७-आराखडा राज्य शासनाला सादर
९ जून २०१७-उच्चाधिकार समितीची आराखड्याला मंजुरी
पहिल्या टप्प्यातील कामे
- बिंदू चौक, सरस्वती चित्रमंदिरानजीक तीन मजली वाहनतळ इमारत. -
व्हीनस कॉर्नर चौकात भक्त निवास आणि वाहनतळाची एकत्रित तीन मजली इमारत.
भक्तांना पूर्वेकडून दर्शनमंडपातून थेट मंदिरात प्रवेश. -
मुखदर्शनासाठी दक्षिण प्रवेशद्वारातून प्रवेश; तर पश्चिमेकडील महाद्वारमधून भक्तांना बाहेर पडण्याची सोय. -
बिंदू चौक ते भवानी मंडप (जेल मार्ग) हा मार्ग वाहतुकीसाठी बंद.
- अंबाबाई मंदिर परिसरातील सर्व वायरिंंग, गटर्स भूमिगत होणार. -
महोत्सवावेळी दर्शनास येणाऱ्या सुमारे सव्वा कोटी भाविकांचा विचार करून आराखडा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अंतिम सादरीकरण केल्यानंतर कामाच्या निविदा प्रसिध्द केल्या जातील. नंतर ठेकेदार निश्चित केला जाईल. कामाची वर्क आर्डर दिल्यापासून दोन वर्षात सर्व कामे पूर्ण केली जातील.
नेत्रदिप सरनोबत , नगरअभियंता