मृत्यूनंतरही त्यांचे हृदय धडधडते!, कोल्हापुरात अवयवदान चळवळीला मिळतंय बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 04:59 PM2023-01-20T16:59:58+5:302023-01-20T18:01:13+5:30

शासकीय रुग्णालयात अवयव रोपण होत नसल्यामुळे तेथे एकही अवयव प्रत्यारोपण झालेले नाही

Organ donation movement is gaining strength in Kolhapur | मृत्यूनंतरही त्यांचे हृदय धडधडते!, कोल्हापुरात अवयवदान चळवळीला मिळतंय बळ

मृत्यूनंतरही त्यांचे हृदय धडधडते!, कोल्हापुरात अवयवदान चळवळीला मिळतंय बळ

Next

संदीप आडनाईक

कोल्हापूर : ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या रुग्णालयामार्फत दोन दात्यांनी सहा जणांना अवयव दान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत. शासकीय रुग्णालयात अवयव रोपण होत नसल्यामुळे तेथे एकही अवयव प्रत्यारोपण झालेले नाही. नेत्ररोपणात मात्र शासकीय रुग्णालयाने बाजी मारली आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये तब्बल ४१ नेत्ररोपण झाले आहे.

तीन दात्यांचे तीन अवयव दान

कोल्हापुरातील देवाळे, ता. करवीर येथील एका दात्याने एप्रिल २०२२ मध्ये एक यकृत, एक किडनी आणि एक हृदय दान केले. त्याचे यकृताचे प्रत्यारोपण आधार हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. एका किडनीचा एक भाग आधारला तर दुसरा पूना हॉस्पिटलला देण्यात आला. मे २०२२ मध्ये २४ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे ३८ वर्षीय भाजी विक्रेत्याला यकृत बसविले, तर चौघांना त्याचे डोळे, मूत्रपिंड, हृदय बसवल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.

अवयवांसाठी प्रतीक्षा यादी मोठी

पुणे विभागात विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडे (झेडटीसीसी) गेल्या वर्षांत फक्त ४६ अवयवदान केले आहे आणि अवयव प्रत्यारोपणासाठी पाच हजारांहून अधिक जणांची मागणी आहे.

जनजागृतीची गरज

जनजागृतीचा अभाव असल्याने भारतात अवयवदानास कमी प्रतिसाद मिळतो. प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे स्पेनमध्ये ४९ आणि अमेरिकेमध्ये ३० टक्के अवयवांचे दान केले जाते. या तुलनेत भारतात हे प्रमाण केवळ ०.५ अवयवदान एवढे कमी आहे. भारतात केवळ तीन टक्के नोंदणीकृत अवयवदाते आहेत, असे अवयवदानाच्या प्रणेत्या डॉ. शीतल महाजनी यांनी सांगितले.

कोणते अवयव दान करता येऊ शकतात?

मूत्रपिंड, फुप्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप आणि कानांचे डूम.

अवयव दानाची प्रक्रिया काय?

रुग्णालयाकडून संबंधित रुग्णाची माहिती झेडटीसीसीला दिली जाते. या समितीकडून संबंधित हॉस्पिटलला अवयवदान करण्यासाठी लागणारी मान्यता, रुग्णाची माहिती, गरजू रुग्णाची माहिती, रक्तगट, डॉक्टरांचा अहवाल, रुग्णाची तसेच कुटुंबाची संमती आदींची तपासणी केली जाते. प्राधान्यक्रमानुसार रुग्णाने केलेली मागणी, हॉस्पिटलची नावे समितीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जातात. त्याची माहिती हॉस्पिटलला दिली जाते. अवयवदान करणाऱ्याचे आणि प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णाचे नाव गुप्त ठेवले जाते. प्रत्यारोपणाचा सर्व खर्च रुग्णाकडून केला जातो.

वर्षभरात किती दात्यांनी केले अवयव दान?
अवयव  -  दाते
हृदय - २
मूत्रपिंड -२
यकृत -२
फुप्फुस -०
नेत्र - ४१

अवयवदान हेच श्रेष्ठदान आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून नातेवाईकांनी आपल्या व्यक्तीचे अवयव दान करणे ही मोठी सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. - डाॅ. गिरिश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, राजर्षि शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.

Web Title: Organ donation movement is gaining strength in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.