सेंद्रिय शेतीच देशाचे भविष्य

By Admin | Published: January 31, 2015 12:19 AM2015-01-31T00:19:56+5:302015-01-31T00:25:16+5:30

धनंजय महाडिक : भीमा कृषी प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

Organic farming country's future | सेंद्रिय शेतीच देशाचे भविष्य

सेंद्रिय शेतीच देशाचे भविष्य

googlenewsNext

कोल्हापूर : सेंद्रिय शेती उत्पन्नाची गरज पाहता त्याकडे शेतकऱ्यांनी वळावे. प्रगत देशांनी सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान जोपासले आहे. सेंद्रिय शेतीच भारताचे भविष्य असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. आमदार महादेवराव महाडिक अध्यक्षस्थानी होते.
खासदार महाडिक म्हणाले, कृषी प्रदर्शनामुळे एकाच छताखाली प्रगत तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल. न्यूझीलंडमध्ये मुक्त गोठा पद्धतीमुळे एक कुटुंब पाचशे गायी सांभाळत आहे, येथील शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा.
आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी आपल्या जीवनात क्रांती करावी, यासाठी खासदार महाडिक गेल्या दहा वर्षांपासून भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांनी सतत प्रयोगशील राहिले पाहिजे. शेती उत्पन्नावर आधारित उद्योगधंदे ग्रामीण भागात उभारले पाहिजेत, यासाठी उद्योजकांनी पुढे येणे गरजेचे आहे.‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांचे भाषण झाले. यावेळी विविध पुरस्कार व स्पर्धेतील बक्षीस वितरण झाले. यावेळी आमदार अमल महाडिक, ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, रणजित पाटील, पी. डी. धुंदरे, सुरेश पाटील, भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, राजाराम कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, सत्यजित भोसले, सत्यजित कदम, माणिक पाटील-चुयेकर, महापालिका महिला व बालकल्याण सभापती लीला धुमाळ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

शासनाच्या मदतीशिवाय प्रदर्शन
कृषी प्रदर्शन भरविणे एवढे सोपे नाही. अनेकजण प्रदर्शन भरवितात; पण शासनाच्या मदतीशिवाय हे प्रदर्शन सलग दहा वर्षे भरविले जात आहे. अशाप्रकारचे हे पहिलेच कृषी प्रदर्शन असून त्याला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे गौरवोद्गार आमदार महादेवराव महाडिक यांनी काढले.

पवारसाहेब मार्ग काढतील!
कधी नव्हे इतका साखर उद्योग अडचणीत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येत आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. ते मोदींना विनंती करून काही तरी मार्ग काढतील व कच्चा साखरेला ५०० ते ६०० रुपये अनुदान मिळवून देतील, अशी अपेक्षा आमदार महाडिक यांनी व्यक्त केली.


पालकमंत्री अनुपस्थित!
भीमा प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होते; पण अचानक मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक मुंबई येथे बोलावल्याने मंत्री पाटील यांना त्यासाठी जावे लागल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.


जिजामाता शेतीभूषण पुरस्कार
पद्मिनी माळी (मौजे सागांव), विमल दिंडे (बहिरेश्वर), अंजना पाटील (खानापूर), पद्मा सितापे (कोथळी), पद्मावती दिंडे (वडणगे).
शेतीभूषण पुरस्कार
दिलीप सबनीस (वालूर), बाजीराव पाटील (पार्ले), राहुल शिंदे (माले), सीताराम पाटील (बारवे), मारुती पाटील (नागांव).
आदर्श शेतकरी पुरस्कार
डॉ. वालचंद्र इंगळे (जयसिंगपूर), सुवर्णा पाटील (सागाव), आण्णासो मगदूम (वाठार), शीतल पाटील (चिंचवाड), बंडू चौगले (सांगवडेवाडी), तानाजी चौगले (म्हाळूंगे), तातोबा मेढे (गणेशवाडी), सुरेश पाटील (माले), तानाजी पाटील (हिरवडे-कोदवडे), राजगोेंडा पाटील (वसगडे).
उत्कृष्ट संशोधक पुरस्कार
डॉ. आनंदा चवई (तांत्रिक अधिकारी, राहुरी कृषी विद्यापीठ), प्रा. गजानन नेवकर (प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र), डॉ. संग्राम धुमाळ (कृषी महाविद्यालय).
आदर्श तालुका कृषी अधिकारी
दिलीपकुमार पाटील (टोप).
आदर्श कृषी विस्तार अधिकारी
प्रवीण शिंदे (शिवाजी पेठ), शंकर मुगडे (खाटांगळे), सुरेश सूर्यवंशी (कृषी महाविद्यालय), तानाजी पाटील (कळंबा), शीतल जाधव (दोनवडे).

Web Title: Organic farming country's future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.