सेंद्रिय शेती शेतकऱ्याचं आरोग्य हाती
By Admin | Published: February 28, 2017 12:42 AM2017-02-28T00:42:24+5:302017-02-28T00:42:24+5:30
सांगरूळच्या राहुल खाडे यांची शेती : वाढत्या खर्चावर ‘झिरो बजेट’चा प्रभावी तोडगा
सायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबर माणसांचेही आरोग्य अडचणीत आले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय असला तरी ही शेती परवडणारी नसल्याने अनेकांनी दोन-तीन वर्षांनंतर पुन्हा रासायनिक शेतीचा मार्ग अवलंबला आहे; पण करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील राहुल विलास खाडे यांनी नफा-तोट्याचा विचार न करता तब्बल नऊ वर्र्षे ‘झिरो बजेट’ शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे.
खाडे यांचे संपूर्ण क्षेत्र नदीबुडीत असल्याने दोन वर्षांतून उसाचे एक पीक घेता येते. पुराच्या पाण्याने आठ-दहा दिवस तळ ठोकला तर उसाच्या पोकळ कांड्याच पदरात पडतात. यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला. देशी गायीचे दूध व मलमूत्र दोन्ही आरोग्यवर्धक आहे. खाडे यांनी औदुंबर (जि. सांगली) येथून पहिली देशी गाय खरेदी करून तिच्या माध्यमातून पंधरा गुंठ्यांत सेंद्रिय शेतीस सुरुवात केली.
नऊ फुटांची सरी सोडून त्यात उसाची रोपे लावली. दोन सरींमधील मोकळ्या जागेत वांगी, श्रावण घेवडा, मेथी, पोकळा अशा भाजीपाल्याचे पीक घेतले. त्यातून सुमारे पंचवीस हजारांचे उत्पन्न मिळविले. रोपे स्वत: तयार केल्याने पाणी वगळता एक रुपयाचाही खर्च यासाठी झाला नाही. भाजीपाला घेतल्यानंतर आता त्यांनी मोकळ्या पट्ट्यात कोबी, मूग, उडीद घेतला आहे. कोबी, मूग, उडदाच्या पेरणीनंतर २१ दिवसांनी त्याचे शेंडे खुडल्याने रोपाला चांगला फुटवा फुटला आहे. मोकळ्या पट्यामुळे सूर्यप्रकाश व मोकळी हवा राहत असल्याने उसाचे पीक जोमात आले आहे. त्यात ठिबकने पाणीपुरवठा असल्याने पिकाला गरजेपुरतेच पाणी मिळते. देशीचे गाईचे मलमूत्र, शेण, गूळ व डाळीच्या पिठापासून तयार केलेले ‘जीवामृत’ याचा वापर केल्याने पिकांच्या अंगात अधिक रोगप्रतिकारक शक्ती येते. परिणामी पीक पुराच्या पाण्यात जरी राहिले तरी उसाच्या वजनात फारसा फरक पडत नाही.
खाडे गेली नऊ वर्षे अशा प्रकारे शेती करीत असल्याने जमीन नेहमीच भुसभुसीत राहते. पाण्याचा फेर कितीही लांबला तरीही जमिनीला भेगा पडत नाहीत आणि पीक वाळतही नाही, इतकी ताकद जमिनीच्या अंगात आली आहे. आगामी काळात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केली तरच माणसांबरोबर जमिनीच्या आरोग्याबरोबर आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे.
राहुल सेंद्रिय गूळाची निर्मिती करीत केवळ गुळावर न थांबता गुळाची पावडर करून तिची निर्यात करण्याचा राहुल यांचा मानस आहे.
रासायनिक खतांचा मारा करीत प्रत्येकजण उत्पन्नवाढीचा प्रयत्न करु लागल्याने आपल्याबरोबर जमिनीचेही आयुष्य कमी झाले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच पर्याय असून, नोकरीप्रमाणे शेतीकडे लक्ष दिले तर निश्चितच ही शेती फायदेशीर ठरू शकते.
- राहुल खाडे (प्रगतशील शेतकरी)
आंतरपीक म्हणूनच ऊस
उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून भाजीपाला व कडधान्य घेणारे अनेक शेतकरी आपण पाहतो; पण ऊस अठरा महिन्यांनी तुटणार आणि विसाव्या महिन्यांत पैसे हातात येणार यापेक्षा ताजे पैसे देणारी कडधान्ये, भाजीपाला पिकविला तर तो अधिक फायदेशीर ठरतो. म्हणून उसाला आंतरपीक म्हणून घेण्याची किमया खाडे यांनी केली. पंधरापैकी जेमतेम पाच गुंठेच उसाची लावणी आहे.
कृषी पदवीधारकापेक्षाही अधिक ज्ञान
राहुल खाडे यांचे वय जेमतेम ३२ वर्षे आणि शिक्षणही दहावी-बारावीपर्यंतच आहे. त्यांनी शेतीमध्ये स्वत:ला अक्षरश: वाहून घेतल्याने त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे ज्ञान कृषी पदवीधरापेक्षही अधिक आहे. घरात सेंद्रिय भाजीपाला, धान्यासह सगळेच पदार्थ वापरत असल्याने पाच-सहा वर्षांत दवाखान्याकडे ते फिरकले नसल्याचे त्यांनी सांगितले.
$$्निराजाराम लोंढे, कोल्हापूर