आटकेत सेंद्रिय शेतीची संशोधन कार्यशाळा

By admin | Published: March 18, 2017 09:36 PM2017-03-18T21:36:40+5:302017-03-18T21:36:40+5:30

शेतकऱ्याची यशोगाथा : बियाणे, औषधासह खताची निर्मिती; दोन हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Organic Organic Research Workshop | आटकेत सेंद्रिय शेतीची संशोधन कार्यशाळा

आटकेत सेंद्रिय शेतीची संशोधन कार्यशाळा

Next

कऱ्हाड तालुक्यातील आटके येथील अनिल कुलकर्णी यांनी आपल्या पंधरा एकरात सेंद्रिय शेती संशोधन कार्यशाळा उभी केली आहे. सध्या ते नऊ हजार एकर शेतीसाठी सुमारे दोन हजार शेतकऱ्यांना ते सेंद्र्रिय शेतीच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करत आहेत. सेंद्रिय शेतीसाठी लागणारी खते, बियाणे व विविध औषधांची त्यांनी सेंद्रिय पद्धतीने स्वत:च निर्मिती केली आहे. ही शेती व त्यामधील उत्पादने आरोग्यासाठी संजीवनीच आहे.
पाण्याचे योग्य व्यवस्थापन, संतुलित खत मात्रा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आटके येथील दत्तात्रय ऊर्फ अनिल रामचंद्र कुलकर्णी यांनी १९८५ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्याबरोबर शेती करण्याकडे लक्ष घातले. सुरुवातीपासूनच त्यांचा सेंद्रिय शेती करण्याकडे कल होता. प्रथम स्वत:च्या पंधरा एकरातच विविध यशस्वी प्रयोग करत किफायतशीर शेती करण्यास प्रारंभ केला. शेतीत ऊस, गहू, भात, भुईमूग ही प्रमुख पिके घेत असताना त्यांनी स्वत:च्या शेतात सेंद्रिय शेतीचे विविध यशस्वी प्रयोग केले. सेंद्रिय शेती पद्धतीने जमिनीची सुपिकता अबाधित राखण्याबरोबरच मानवी शरीराला आवश्यक सकस अन्नाची निर्मिती होत असल्याची खात्री आली. गेली पंचवीस वर्षांपासून उसाची पाचट जाळणे त्यांनी बंद केले. स्वत:ला खात्री आल्यावर सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या खते, बियाणे व फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांचे संशोधन करून त्यांची निर्मिती करण्याकडे मोर्चा वळवला. त्यामध्ये त्यांना यशही आले. कुलकर्णी यांनी सेंद्रिय शेती हा व्यवसाय समजण्यापेक्षा याकडे उद्योग म्हणून लक्ष केंद्रित केले. या उद्योगात उत्तरोत्तर प्रगती होत गेली. या पद्धतीने शेती करत असताना गरजेनुसार आधुनिकीकरण करत नवनवीन तंत्रज्ञानाचाही अवलंब त्यांनी शेतीत केला. परिणामी सोयाबीनचे एकरी २४ क्विंटल तर गव्हाचे एकरी २५ ते ३० क्विंटल असे विक्रमी उत्पादन मिळाले. २००९ मध्ये उसाचे एकरी ११० टन उत्पादन काढून कृष्णा कारखान्याचे पारितोषिकही मिळविले. मुख्य पिके घेण्याबरोबरच परिसरातील गरज ओळखून पालेभाज्यासह विविध पिकवत आहेत. गाजर, दुधीभोपळा, कारले, कोबी व सर्व प्रकाराच्या पालेभाज्या सेंद्रिय पद्धतीचा असल्यामुळे त्यांच्या उत्पादनाला कऱ्हाडसह परिसरातून मागणी आहे.
स्वत:च्या सेंद्रिय शेतीबरोबरच इतर शेतकऱ्यांनाही या तंत्राचा फायदा व्हावा, या उद्देशाने कुलकर्णी यांनी २००५ पासून सेंद्रिय शेती सल्लागार म्हणून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. हंगामानुसार पिकांची निवड व नियोजन तसेच उत्तम शेती व शेतीमाल विक्री तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी ९०० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. सध्या ते सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड व वासीम जिल्ह्यांतील ९ हजार एकरासाठी सुमारे दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ते सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करत आहेत.
आटकेतील शेतात विविध ठिकाणांहून आलेल्या शेतकऱ्यांसाठी महिन्यात दोन अशा वर्षाला चोवीस ते पंचवीस कार्यशाळा घेतल्या जातात. आधुनिक सेंद्रिय पद्धतीचा व गांडूळखतनिर्मिती प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी वर्षात किमान दहा ते पंधरा शालेय व महाविद्यालयीन सहली भेट देतात.


सेंद्रिय शेतीसाठी जीवांमृत निर्मिती
सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खताचा एकरी दोन टन वापर केला जातो. पोषक द्रव्य म्हणून जीवांमृत हे द्रव्य वापरले जाते. या द्रव्य निर्मितीसाठी १० किलो शेण, १० लिटर गोमूत्र, १ किलो कडधान्याचे पीठ व १ किलो गूळ याचे मिश्रण करतात. ते मिश्रण वरचेवर ढवळून सात दिवस सडवावे लागते. मग सातव्या दिवशी ते जीवांमृत तयार होते. ते तयार जीवांमृत एका एकरासाठी पाण्यातून सोडले जाते. या जीवांमृताची निर्मिती ते स्वत:च करतात.

रोगप्रतिकारक म्हणून दशपर्णी अर्क
सेंद्रिय शेती पद्धतीत कोणतेही रासायनिक द्रव्य वापरले जात नाही. पिकावरील कीड व रोगासाठी रोग प्रतिबंधक म्हणून दशपर्णी अर्क वापरले जाते. हे अर्क बनवताना शेळी खात नाहीत, अशा दहा वनस्पती निवडल्या जातात. त्यामध्ये गुळवेल, रुई, सीताफळ, करंजी, लाल मिरची, पपई, कनेर, लसूण, निरगुडी व घाणेरी या दहा वनस्पतींच्या पानांपासून हे दशपर्णी अर्क बनवले जाते. ते अर्क पिकावर रोगप्रतिबंधक म्हणून फवारले जाते. त्याचबरोबर अँसिटो, रायझोबीयम, पीएचबी व केएसबी या जिवांणूचाही वापर सेंद्रिय शेतीत केला जातो.


शेणखताबरोबरच पीक वाढीसाठी पंचद्रव्य मिश्रण
सेंद्रिय पद्धतीने पिकाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी देशी गायींच्या शेणखताबरोबरच पंचद्रव्य मिश्रणाचा वापर केला जातो. हे मिश्रण तयार करण्यासाठी देशी गायीचे दूध, तूप, दही, शेण व गोमूत्र याचा वापर केला जातो. हे पंचद्रव्य मिश्रण स्वत:च तयार करतात.

शेतीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. देशी गाय ही नुसती गाय नसून ते वैज्ञानिक दृष्टीने संशोधनाचे विद्यापीठ आहे. अनेक रोगांवर उपयुक्त असे गोमूत्रअर्क निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. भविष्यात सेंद्रिय शेती व देशी गायीचे संगोपन प्रसार करणे हे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवले आहे.
- अनिल कुलकर्णी, शेतकरी

Web Title: Organic Organic Research Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.