बालिंगा नदीपात्रात जैविक कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:25 AM2020-12-31T04:25:56+5:302020-12-31T04:25:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : बालिंगा पुलाच्या शेजारी नदीपात्रातच अज्ञाताकडून जैविक कचरा टाकल्याचे आज निदर्शनास आले आहे. हा सर्व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : बालिंगा पुलाच्या शेजारी नदीपात्रातच अज्ञाताकडून जैविक कचरा टाकल्याचे आज निदर्शनास आले आहे. हा सर्व कचरा बालिंगा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी गोळा करून त्याची विल्हेवाट लावली असली तरी लोकांच्यातून अज्ञातांकडून झालेल्या या कृतीबद्दल संताप व्यक्त होत आहे.
आज कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर बालिंगा पुलाशेजारी भोगावती नदीपात्रात दवाखान्यात वापरलेल्या सिरिंज, इंजेक्शन, हॅण्डग्लोज व इतर जैविक कचरा बेमालूमपणे अज्ञाताने विशेषतः नदीपात्रात टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत लोकांनी बालिंगा ग्रामपंचायतीमध्ये माहिती देताच कर्मचारी संतोष जाधव यांनी तो इतर सहकारी कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन गोळा केला आहे. जवळपास एक प्लास्टिक पोते भरेल एवढा हा जैविक कचरा असल्याने लोकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भोगावती नदी प्रदूषण आणि लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या अज्ञातांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे
चौकट
बालिंगा पुलाच्या पूर्वेला कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याला लागूनच शेजारच्या गावांंचा कचरा विल्हेवाट लावली जाते. त्याचा फायदा उठवत उपनगरांतील काही हॉटेल, धाबाचालक, दवाखान्यातील जैव कचरा बेमालूमपणे रात्री आंधाराचा फायदा घेऊन येथे कचरा टाकतात.
२) कोरोनाच्या काळातही येथे अशाच जैव कचऱ्याबरोबर पीपीई किटचे गाठोडे टाकले होते. या कचऱ्यामुळे ऐतिहासिक बालिंगा पुलाला गालबोट लागत आहे
फोटो कँप्शन
बालिंगा पुलाजवळ नदीपात्रात टाकण्यात आलेला जैवकचरा बालिंगा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी गोळा करून पोते भरले