लावणीच्या तडक्याला ठेक्याची दाद, ‘लोकमत सखी मंच’चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 05:42 PM2020-02-29T17:42:13+5:302020-02-29T17:44:26+5:30
लावण्यवतींचे सौंदर्य, दिलखेचक अदा... घुंगरांचा नाद, ढोलकीची थाप, तबल्याचा ताल, पारंपरिक लावणीला फ्युजनचा तडका देत नृत्यांगनांनी सादर केलेल्या बहारदार लावण्यांनी शुक्रवारी सखींची सायंकाळ रंगली. या नृत्याविष्काराला टाळ्या, शिट्ट्या आणि नृत्याने दाद देत सखींनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
कोल्हापूर : लावण्यवतींचे सौंदर्य, दिलखेचक अदा... घुंगरांचा नाद, ढोलकीची थाप, तबल्याचा ताल, पारंपरिक लावणीला फ्युजनचा तडका देत नृत्यांगनांनी सादर केलेल्या बहारदार लावण्यांनी शुक्रवारी सखींची सायंकाळ रंगली. या नृत्याविष्काराला टाळ्या, शिट्ट्या आणि नृत्याने दाद देत सखींनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
महासैनिक दरबार लॉनच्या हिरवळीवर सायंकाळच्या आल्हाददायक वातावरणात रंगलेल्या या ‘तुझ्यात जीव रंगला’ शोचे उद्घाटन प्रतिमा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे मॅनेजर विकास जैन, एचआर एक्झिक्युटिव्ह नम्रता भोसले उपस्थित होत्या. दरम्यान, महापौर निलोफर आजरेकर यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावून सखींचा उत्साह वाढविला व ‘लोकमत सखी मंच’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनानंतर सुरू झाला लावण्यांचा रंगारंग कार्यक्रम. रंगमंचाला अभिवादन करीत गणेशवंदना सादर झाली. ‘घ्यावा माझा सलामीचा मुजरा’ या लावणीने रसिक सखींना मुजरा करण्यासाठी सगळ्या लावण्यवती रंगमंचावर आल्या. ‘तुझ्यात जीव रंगला’ म्हणत त्यांनी सखींना आपलेसे केले. ‘उधळीत ये रे गुलाल सजना’ या गवळणीने शाम-राधेच्या प्रेमाची प्रचिती दिली.
लावण्यवती अर्चना जवळेकर यांनी ‘या रावजी बसा भावजी’ या गाजलेल्या लावणीने खऱ्या अर्थाने लावण्यरंगाच्या उधळणीला सुरुवात केली. त्यानंतर ‘जरा खाजवा की बुगडी शोधायला डोकं,’ ‘फड सांभाळ तुºयाला गं आला,’ ‘तुम्हावर केली मी मरजी बहाल...’ या पारंपरिक लावण्यांनी गाजवलेला काळ नृत्यातून उभा केला. ‘ऐका दाजिबा,’ ‘आता वाजले की बारा’ या नव्या पिढीतील लावण्यांची मोहिनी नव्याने सखींवर घालत नृत्यांगनांनी वन्समोअर घेतला.
फ्युजनचा जमाना आहे पारंपरिक लावणीला व गाजलेल्या लावणी गीतांना या फ्युजनचा तडका देत झालेल्या सादरीकरणाने सखींना आपसूकच आपल्या तालावर डोलायला लावले. ‘बाई वाड्यावर या,’ ‘शांताबाई,’ ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाजलेल्या गीतांच्या नृत्यावर ठेका घरत नृत्यांगना थेट महिला प्रेक्षकांमध्येच गेल्या. त्यामुळे सखींच्या उत्साहालाही बहर आला. या शोमध्ये युवा लावणीसम्राज्ञी अर्चना जवळेकर, संगीता लाखे, अक्षता मुंबईकर, प्राची मुंबईकर यांच्यासह दहा नृत्यांगनांनी बहारदार लावण्या सादर केल्या. प्रिया देसाई यांनी प्रास्ताविक केले.
हिरवळीवर खचाखच गर्दी...
नवीन वर्षात सखी परिवारात दाखल झालेल्या सदस्यांनी या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या एक तास आधीपासूनच महिला हिरवळीवर येत होत्या. सहानंतर लॉन सखींनी खचाखच भरला. आल्हाददायक सायंकाळी हिरवळीवर निवांत बसून सखी या कार्यक्रमाचा आनंद लुटत होत्या.
टाळ्या, शिट्ट्यांनी दाद
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोलकीची थाप आणि तबल्यावर सादर झालेल्या तोड्याने वातावरणात लावण्याचे रंग भरले. या सलामीलाच तरुणी महिलांपासून ते वयोवृद्ध आजींपर्यंतच्या महिलांनी नृत्याचा ठेका धरला. काहीजणी कसलेल्या नृत्यांगनांप्रमाणे, तर अनेकजण आपल्याला जमेल तसे नृत्य करीत आपल्या मनातली इच्छा पूर्ण करीत होत्या. त्यांच्या या उत्साहात सहभागी होत संचातील नृत्यांगनाही रंगमंचावरून खाली येऊन सखींसोबत नृत्य करीत होत्या. या जल्लोषी वातावरणाला साथ मिळत होती ती टाळ्या आणि शिट्ट्यांनी.