प्रवेश प्रक्रियेबाबत बैठक आयोजित करा; शिवसेना, युवासेनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 04:59 PM2019-06-10T16:59:21+5:302019-06-10T17:01:06+5:30
डोनेशन, बांधकाम शुल्क, शालेय साहित्य या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांची लूट शिक्षण सम्राटांकडून होत आहे. पालकांची लूट करणाऱ्या शाळा, महाविद्यालये बंद करा, अशी मागणी युवासेनेने शिक्षण उपसंचालकांकडे सोमवारी केली.
कोल्हापूर : डोनेशन, बांधकाम शुल्क, शालेय साहित्य या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांची लूट शिक्षण सम्राटांकडून होत आहे. पालकांची लूट करणाऱ्या शाळा, महाविद्यालये बंद करा, अशी मागणी युवासेनेने शिक्षण उपसंचालकांकडे सोमवारी केली.
येथील शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना, युवासेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी लाखो रुपयांचे डोनेशन आकारले जात आहे. काही ठरावीक शाळा तर उघडपणे डोनेशन घेत आहेत. यावर कोणती कारवाई कार्यालयाने केली, असा जाब आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी विचारला. त्यावर शिक्षण विभागाचे अधिकारी निरुत्तर राहिले.
डोनेशन घेणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवर कोणती कार्यवाही करण्यात आली. त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत द्या, अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. प्र
वेश प्रक्रिया सुरूहोण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, शिक्षण विभागाशी निगडीत सर्व विभाग व अधिकारी आणि सर्वच शिक्षण संस्थांचे प्रमुख यांची संयुक्तिक बैठक आयोजित करावी, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी दिल्या. त्यावर साहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी तक्रार असलेल्या शाळांना नोटीस काढली जाईल. गेल्या दोन वर्षांतील कारवाईचा अहवाल तातडीने दोन दिवसांत देण्याबाबतची ग्वाही दिली.
दरम्यान, साहाय्यक शिक्षण संचालक चौगुले, महानगरपालिका प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, दीपक गौड, युवासेनेचे योगेश चौगुले, अविनाश कामते, चेतन शिंदे, विश्वजित साळोखे, जयवंत हारुगले, किशोर घाटगे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, आदी सहभागी झाले.
घोषणा देत निदर्शने
शिक्षण सम्राट आणि शिक्षण खात्याच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. मोर्चाच्या अग्रभागी शिक्षणसम्राटांचा राक्षस पालक, विद्यार्थ्यांच्या गळ्यावर सुरी ठेऊन लूट करीत असल्याचा देखावा सादर करण्यात आला.