‘केआयटी’मध्ये आयआयमूनतर्फे संयुक्त राष्ट्र संसदेचे आयोजन
By admin | Published: March 4, 2015 11:24 PM2015-03-04T23:24:31+5:302015-03-04T23:51:34+5:30
शनिवारपासून प्रारंभ : महाराष्ट्र, कर्नाटकातील १५० विद्यार्थ्यांचा सहभाग
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय राजकारणात विद्यार्थ्यांचा रस वाढावा, त्यांना संयुक्त राष्ट्र संसदेच्या कामकाजाची माहिती व्हावी, या उद्देशाने केआयटी कॉलेजमध्ये इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स्च्या कोल्हापूर चॅप्टरतर्फे (आयआयमून) संयुक्त राष्ट्र संसदेचे आयोजन केले आहे.
शनिवार (दि.७) पासून तीन दिवस संसद होणार आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटकातील १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा स्वरूपातील संसद होत आहे, अशी माहिती ‘केआयटी’चे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी व कार्यक्रमाच्या समन्वयक सृजनी श्रावणे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कार्जिन्नी म्हणाले, आयआयमून ही संकल्पना संयुक्त राष्ट्र संसदेची प्रतिकृती आहे. त्यात संयुक्त राष्ट्रसंघाचे काम, उद्दिष्टे याबाबत सहभागी विद्यार्थ्यांना माहिती व प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. यात सहभागी विद्यार्थ्यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती, डीआयएससी, लोकसभा व शंभर स्मार्ट सिटीची शक्यता, आंतरराष्ट्रीय पत्रकारिता या विभागात विभागणी केली आहे.
समन्वयक श्रावणे म्हणाल्या, आयआयमून ही आशियातील मोठी युवा संस्था आहे. त्यात १९ ते २२ वर्षांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. केआयटीमधील संयुक्त राष्ट्र संसदेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर जिल्हा आयटी असोसिएशनचे अध्यक्ष विनय गुप्ते यांच्या हस्ते होईल. रविवारी (दि. ८) व सोमवारी (दि. ९) चर्चा, वादविवाद आणि विविध विषयांवरील सादरीकरण होईल. त्यात सहभागी विद्यार्थी हे शालेय व महाविद्यालयीन आहेत. रोटरॅक्ट व इनरव्हील क्लब आॅफ कोल्हापूर यांच्या सहकार्याने कार्यक्रम होणार आहे. या संसदेतील ठराव ‘युनो’ला पाठविण्यात येतील. कार्यक्रमात ‘आयआयमून’चे उपाध्यक्ष अमन बालडिया व सहायक संचालक शुभम रामचंदानी हे मार्गदर्शन करणार आहेत.
पत्रकार परिषदेस इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा कविता पाटील, प्रमोद पाटील, मोनिका सानंदम, राजेंद्र हेद्दूर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)